विराट सेनेचा मालिकेवर कब्जा; रोहित, राहुल, कोहली यांचा झंझावात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 03:46 AM2019-12-12T03:46:49+5:302019-12-12T06:26:04+5:30

तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ६७ धावांनी पराभव

India won the three-match T20I series against the West Indies 2-1 | विराट सेनेचा मालिकेवर कब्जा; रोहित, राहुल, कोहली यांचा झंझावात

विराट सेनेचा मालिकेवर कब्जा; रोहित, राहुल, कोहली यांचा झंझावात

Next

- रोहित नाईक 

मुंबई : आघाडीच्या फलंदाजांनी धावांचा एव्हरेस्ट उभारुन दिल्यानतर प्रतिस्पर्धी फलंदाजांना अखेरपर्यंत दडपणाखाली ठेवत भारताने अखेरच्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजला ६७ धावांनी नमविले. या दिमाखदार विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारताने २० षटकात ३ बाद २४० धावा फटकावल्या. या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीज संघाला २० षटकात ८ बाद १७३ धावाच करता आल्या.

भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमवर भारताने टी२० क्रिकेटमधील आपली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या उभारली. घरच्या मैदानावर खेळणारा ‘हिटमॅन’ रोहित शर्मासह लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांच्या झंझावाती फलंदाजीपुढे विंडीजच्या गोलंदाजांना मजबूत चोप बसला. रोहितने ३४ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारांचा तडाखा देत ७१ धावांची वादळी खेळी केली. राहुलने ५६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९१ धावा चोपल्या. याशिवाय कोहलीने पुन्हा एकदा विंडीज गोलंदाजांना आपल्या रुद्रावताराचे दर्शन घडवून देताना २९ चेंडूत ४ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ७० धावा कुटल्या.

भारताने दिलेल्या भल्यामोठ्या आव्हानाचे ओझे विंडीजला सुरुवातीपासून पेलवलेच नाही. त्यात क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाल्याने धडाकेबाज सलामीवीर एविन लुईस मैदानाबाहेर गेल्याने विंडीजच्या फलंदाजीतील हवाच निघाली. कर्णधार किएरॉन पोलार्डने ३९ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह विंडीजच्या अंधुक आशा कायम राखल्या होत्या. शिमरॉन हेटमायरनेही २४ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ४१ धावा केल्या. लेंडल सिमन्स (७), ब्रँडन किंग (५) आणि निकोलस पूरन (०) यांना स्वस्तात बाद करुन भारताने विंडीजची चौथ्या षटकात ३ बाद १७ धावा अशी अवस्था केली. दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेत टिच्चून मारा केला.

तत्पूर्वी, मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या यजमान भारताने रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर धावांचा एव्हरेस्ट उभारला. रोहितने आपल्या घरच्या मैदानावर नैसर्गिक खेळी करताना विंडीज गोलंदाजी फोडून काढली. त्याचवेळी राहुल आणि कोहली यांनीही वादळी खेळी केल्याने भारताने टी२०मधील आपली तिसरी सर्वोत्तम धावसंख्या उभारली. विंडीज कर्णधार पोलार्डने क्षेत्ररक्षणाचा अपेक्षित निर्णय घेतला. निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारतीय तंबूत थोडीफार चिंता निर्माण झाली. मात्र रोहित-राहुल वेगळाच विचार करुन मैदानात उतरले होते. रोहितने आपल्या धमाकेदार खेळीदरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पाही पार केला. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला.

तिसरी सर्वाधिक धावसंख्या

भारतीय फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करताना टी-२० क्रिकेटमधील भारताची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या उभारली. याआधी भारताने इंदूर येथे सन २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ५ बाद २६० धावा, तर सन २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच भारताने लॉडेरहील येथे ४ बाद २४४ धावा उभारल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक :

भारत : २० षटकात ३ बाद २४० धावा (लोकेश राहुल ९१, रोहित शर्मा ७१, विराट कोहली नाबाद ७०; किएरॉन पोलार्ड १/३३, केसरिक विलियम्स १/३७, शेल्डॉन कॉट्रेल १/४०) वि.वि. वेस्ट इंडिज : २० षटकात ८ बाद १७३ धावा (किएरॉन पोलार्ड ६८, शिमरॉन हेटमायर ४१; दीपक चहर २/२०, मोहम्मद शमी २/२५, भुवनेश्वर कुमार २/४१, कुलदीप यादव २/४५.)

सामनावीर : के. एल. राहुल, मालिकावीर : विराट कोहली

Web Title: India won the three-match T20I series against the West Indies 2-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.