मुंबई : जॉर्जिया येथे झालेल्या १३व्या मुलींच्या युरोपीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली. ११ ते १७ एप्रिलदरम्यान ही ऑलिम्पियाड पार पडली. यात भारतातून चार मुलींचा संघ सहभागी झाला होता. यातील हरियाणाच्या गुंजन अग्रवाल आणि केरळच्या संजना चाको या विद्यार्थिनींनी रौप्य पदकेपटकावली. तर हरियाणाच्या लारिसा आणि पुण्याच्या सई पाटील यांनी कांस्य पदकांवर नाव कोरले.
या भारतीय संघाचे नेतृत्व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे साहिल म्हसकर, अदिती मुथखोड आणि अनन्या रानडे यांनी केले. या तिघांचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थिनींना लाभले. या आधी २०१५मध्ये भारताने मुलींच्या युरोपीय गणित ऑलिंपियाडमध्ये अशी कामगिरी केली होती. या संघाला होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचे मोलाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. अणुऊर्जा विभागाच्या नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्सच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला.