मुंबई - नंदुरबार येथे अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस महासंचालकाना दिले.
नंदुरबार येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी, प्रांत अधिकारी अशा 18 भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह भारतीय प्रशासन सेवा असोशिएशन महाराष्ट्र यांचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार येथे अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत माहिती घेतली. या घटनेतील जे दोषी आहेत त्यांना तातडीने अटक करण्याच्या सूचना केल्या. या प्रकरणामध्ये तातडीने योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस महासंचालकाना निर्देश दिले. दोषींवर कारवाई होण्यासाठी गृह विभागाने योग्य ती पावले उचलावी असे निर्देश देतानाच कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा राहील अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत या आठवड्यात आपण नंदुरबार येथे भेट देऊ, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले. नंदुरबार येथील हल्ल्याच्या घटनेत दोन संशयितांना अटक केल्याची माहिती देखील मुख्य सचिवांनी दिली. नागरिकांना अधिक चांगली सेवा देतानाच त्यांच्याशी योग्य सुसंवाद असणे गरजेचे आहे या बाबीवर देखील बैठकीत भर देण्यात आला. नंदुरबार आणि अशाच प्रकारच्या अन्य घटनांमधील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलीस महासंचालकांनी दिली.