Join us

भारतीय बॅडमिंटनची ‘अक्षय’ यशोगाथा

By admin | Published: March 27, 2016 1:42 AM

वयाच्या नवव्या वर्षी अक्षयने ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत प्रवेश घेतला. त्या वेळी बॅडमिंटन म्हणजे काय, याची कल्पना त्याला नव्हती.

- विशेष : महेश चेमटेवयाच्या नवव्या वर्षी अक्षयने ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत प्रवेश घेतला. त्या वेळी बॅडमिंटन म्हणजे काय, याची कल्पना त्याला नव्हती. गुरू श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हातात रॅकेट घेतले, ते आजतागायत कायम आहे. सलग चार आठवडे, चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि चार पदके असा प्रवास अक्षय देवलकर याने केला आहे. बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडिया आयोजित जागतिक प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) दिल्ली एसर्स संघामध्ये अक्षय देवलकरची निवड करण्यात आली. या स्पर्धेत अक्षय आणि त्याचा सहकारी यांना प्रत्येक सामना खेळावाच लागणार होता, कारण त्यांच्या संघाकडे दुसरा पर्याय नव्हता. अन्य संघाकडे विदेशी खेळाडूंचा भरणा असल्याने तुलनेने संघनिवड करणे सोपे नव्हते. दबावात उत्कृष्ट खेळ करणे म्हणजे काय, याचे उत्तर मला या लीगमध्ये सापडले. जगभरातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडूंचा भरणा असलेल्या लीगमध्ये जिंकणे सोपे नव्हते. पण अथक परिश्रम, सामन्याआधी व्यूहरचना आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अक्षयने पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. येथे पहिल्या विजयाची नांदी झाली. पीबीएलनंतर अक्षय लखनौ येथे सय्यद मोदी ग्रांप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेसाठी रवाना झाला. जागतिक स्तरावर सुपर सीरिजनंतर दुसऱ्या क्रमांकाची मानाची स्पर्धा अशी या स्पर्धेची ओळख आहे. स्पर्धेत त्याला साथ लाभली ती जालंदरच्या प्रणव जेरी चोप्राची. अक्षय-प्रणवने स्पर्धेत ठसा उमटवण्यास सुरुवात केली. स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या इंडोनिशियन जोडीशी टक्कर झाली. कोणतेही दडपण न आणता अक्षय-जेरीने त्यांना चांगलेच जेरीस आणत स्पर्धेत आगेकूच कायम राखली. त्यानंतर जागतिक क्रमवारीतील सातव्या स्थानी असलेली डेन्मार्क जोडी असो वा आठव्या स्थानी असलेली कोरियन जोडी. या सगळ्यांचा काटा अक्षयने ‘फुला’ने काढला. पुरुष दुहेरीत कोरियाला भारताने हरवले, असे इतिहासात दिसत नाही. अक्षय-प्रणवने हा सामना जिंकत ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले. अंतिम सामन्यात मलेशियनविरुद्ध झालेला सामना रंगतदार ठरला. सामन्यात विजयाची शर्थ केली पण शेवटच्या क्षणी डाव फसला आणि स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पहिला पराभव हा दुसऱ्या विजयाची चाहूल असते, असे इतिहास सांगतो. अगदी त्याचप्रमाणे नव्या विजयासाठी नव्या दिशेने अक्षय झेपावला, तेही तिसऱ्याच दिवशी. भारतीय बॅडमिंटन संघाबरोबर शिलाँग येथे दाखल झाला. शिलाँगमध्ये ‘दक्षिण आशियाई गेम्स’ची जय्यत तयारी सुरू होती. या स्पर्धेत वैयक्तिक आणि दुहेरी स्पर्धेचे आव्हान होते. स्पर्धेत दिग्गज संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. सामन्यास सुरुवात झाली. कोर्टवर दोन्ही संघ आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी विजयासाठी शर्थ केली. अक्षय-प्रणव विजयी झाले. लंकेवर मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले. शिलाँग विजयानंतर हैदराबाद येथे ‘सिनीयर आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा’भारतीय संघाला खुणावत होती. दक्षिण कोरिया, थायलंड, मलेशियासह चीन, जपान, इंडोनेशिया हे पाहुणे ‘यजमानां’ची वाटच पाहत होते. प्रत्येक गटात पाच सामने खेळून विजेत्याला स्पर्धेत कूच करावी लागत होती. भारत, चीन आणि सिंगापूर अशी गटाची आखणी झाली. स्पर्धेत सिंगापूरविरुद्ध पाच सामन्यांत ५-० असा जिंकला. सिंगापूरला नमवल्यानंतर चीनचा ३-२ असा पराभव करत स्पर्धेत विजयी घौडदौड कायम राखली. चीनचे आव्हान परतवल्यानंतर मलेशियाचादेखील ३-२ पराभव केला. इंडोनेशियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तब्बल ३० वर्षांनी देशाला हे पदक मिळाले. भारताला पुरुष सांघिक गटात १९८६ मध्ये पदक मिळाले होते. सर्व पदके, आजपर्यंतचे सर्व विजय मी माझ्या गुरूंना म्हणजे श्रीकांत वाड यांना अर्पण करतो. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की भारतीय खेळाडूंमध्ये प्रतिभेची कमतरता नाही. आपल्याकडे आजही अनेक गुणवान खेळाडू आहेत. केवळ खेळाच्या पायाभूत सोयी-सुविधांच्या कमतरतेमुळे आपला खेळ, खेळाडू आणि क्रीडासंस्कृती मागे राहत आहे, हरत आहे, विस्मृतीस जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला ‘जॉब गॅरंटी’ मिळाली की तो त्याचे संपूर्ण लक्ष खेळाकडे देऊ शकतो. जगातील सर्वात तरुण देश अशी भारताची ओळख आहे. त्यामुळे देशात खेळ, खेळाडू आणि खेळसंस्कृती टिकवण्यासाठी खेळ वाढवला पाहिजे. खेळाडू जगवले पाहिजे. क्रीडासंस्कृती रुजवली पाहिजे.‘खेळासह माझे मुलाप्रमाणे संगोपन’कुटुंब, कोच आणि खेळ हे नाते उलगडून दाखवताना अक्षय म्हणाला, माझे वडील कबड्डीपटू असल्यामुळे घरात कबड्डीमय वातावरण होते. कबड्डीत दुखापतींची शक्यता जास्त असल्याने मला कबड्डी खेळण्यास बाबांची परवानगी नव्हती. त्यामुळे मर्जी मारून मी क्रिकेटकडे वळलो. क्रिकेटमध्येदेखील काही काळानंतर मन रमेनासे झाले. परिणामी बाबांच्या मित्रांच्या सल्ल्यानुसार मी बॅडमिंटनमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या १३ व्या वर्षी माझ्या बाबांची कंपनी अचानक बंद पडली.त्या वेळी मात्र आता पुढे काय? हा यक्षप्रश्न घरच्यांसमोर उभा होताच. त्यापेक्षादेखील महत्त्वाचे म्हणजे माझा खेळ नुकताच बहरत चालला होता. त्यामुळे माझ्या सरावाचा प्रश्नदेखील आ वासून उभाच होता. मुळात बॅडमिंटन इतर खेळांच्या तुलनेत महाग खेळ आहे. या खेळाचे साहित्य थोडे महाग आहे, परिणामी माझा खेळ काही काळासाठी थांबवण्याचा विचार मी करत होतो. त्याचवेळी वाड सरांना माझी हकीकत समजली. त्यांनी मला आधार दिला. त्यांनी माझे आणि माझ्या खेळाचे मुलाप्रमाणे संगोपन केले.