भारतीय चित्रपटांचा व्यवसाय ५००० कोटींवर; १००० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवत 'कल्की २८९८ एडी' आघाडीवर

By संजय घावरे | Published: July 18, 2024 07:33 PM2024-07-18T19:33:52+5:302024-07-18T19:40:59+5:30

'कल्की'ने १००० कोटी रुपयांहून अधिक बिझनेस केल्याने यंदा भारतीय सिनेसृष्टीच्या व्यवसायाने सातव्या महिन्यात ५००० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

Indian film business at 5000 crores; 'Kalki 2898 AD' tops the charts by collecting more than Rs 1000 crore | भारतीय चित्रपटांचा व्यवसाय ५००० कोटींवर; १००० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवत 'कल्की २८९८ एडी' आघाडीवर

भारतीय चित्रपटांचा व्यवसाय ५००० कोटींवर; १००० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवत 'कल्की २८९८ एडी' आघाडीवर

मुंबई : गेल्या महिनाअखेरीस रिलीज झालेल्या प्रभासच्या 'कल्की २८९८ एडी'ने बॉक्स ऑफिसवरील मेगा ब्लॉकबस्टरची उणीव भरून काढली आहे. 'कल्की'ने १००० कोटी रुपयांहून अधिक बिझनेस केल्याने यंदा भारतीय सिनेसृष्टीच्या व्यवसायाने सातव्या महिन्यात ५००० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

मागील दोन महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनी अनपेक्षित रिझल्ट देत बॉक्स ऑफिसवर चैतन्य निर्माण केले आहे. याच बळावर भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिल्या सहा महिन्यांतील आर्थिक कारभार ५०१५ कोटी रुपयांच्या पलिकडे गेला आहे. यात 'कल्कि'चा वाटा १५% असल्याची माहिती मिळाली आहे. मागील महिन्याभरात भारतीय चित्रपटांनी १२०० कोटी रुपयांची कमाई केल्याचे समजते. मागच्या वर्षाच्या कलेक्शनच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाने जागतिक पातळीवर जवळपास ३३८ कोटी रुपयांचा बिझनेस करत सिनेसृष्टीला शुभशकुन दिला खरा, पण त्यानंतर रिलीज झालेला एकही चित्रपट त्याच्या आसपास पोहोचू शकला नाही. त्यामुळे 'कल्की' रिलीज होण्यापूर्वी यंदा कोणत्याही चित्रपटातला ५०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होण्याचा बहुमान पटकावता आला नाही. ४० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या 'हनुमान' चित्रपटाने ३५० कोटी रुपये कमवत मोठी झेप घेतली. अजय देवगण आणि आर. माधवनच्या 'शैतान'ने भारतात १७८ कोटी रुपये आणि एकूण मिळून २११ कोटी रुपये कमावले. २० कोटी रुपये बजेट असलेल्या मल्याळम 'मंजुमेल बॉर्ईज'ने भारतात १७० कोटी रुपये, तर एकूण २४२ कोटी रुपयांचा बिझनेस केल्याची माहिती मिळाली आहे. 

दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा
यंदा व्यावसायिकदृष्ट्या आघाडीवरील चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा वरचष्मा आहे. 'कल्की' व 'मंजुमेल बॉईज'खेरीज 'आदुजीवीतम', 'गुंटूर कारम', 'आवेशम', 'प्रेमालू' या चित्रपटांनी अनुक्रमे १६० कोटी, १४२ कोटी, १३६ कोटी, १५४ कोटी रुपये बिझनेस केला आहे. 

हॉलीवुडचेही आव्हान
भारतीय चित्रपटांना नेहमीच हॉलीवुडपटांचे मोठे आव्हान असते. हॉलीवुडपटांचा मोठा चाहता वर्ग आपल्याकडे आहे, जो अधिक पैसे खर्च करूनही हॉलीवुडपटांना पसंती देतो. यंदा 'गॉडज़िला एक्स कॉन्ग' या चित्रपटाने भारतात १३० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'पुष्पा २'कडे लक्ष
प्रदर्शित होण्यापूर्वीपर्यंत 'कल्की'कडून फार अपेक्षा व्यक्त केल्या जात नव्हत्या, पण नेत्रदीपक यश मिळवले. त्यामुळे या वर्षात सर्वाधिक बिझनेस करणाऱ्या चित्रपटाचा मान पटकावण्यासाठी 'पुष्पा २'च्या टिमला खूप मेहनत घ्यावी लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

फोटो : कल्की, फायटर, शैतान, मंजुमेल बॉईज, हनुमान
 

Web Title: Indian film business at 5000 crores; 'Kalki 2898 AD' tops the charts by collecting more than Rs 1000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.