मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांमध्ये देशभक्तीची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर शेअर, लाईक आणि वादावादी जोरात सुरू आहे. मात्र, दहशतवाद्यांविरोधात लढताना धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या बलिदानाचा लोकांना विसर पडल्याची खंत एका वीरपत्नीने व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर लोकांनी जबाबदारी व्यक्त व्हावे, असे आवाहनही या वीरपत्नीने केले.
दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणा-या मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्या भावना बोलून दाखविल्या. गणेश गल्ली येथील रस्त्याचे आज लालबागचा राजा असे नामकरण करण्यात आले. या नामकरण सोहळ्यास मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी, अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, खजिनदार मंगेश दळवी आदी उपस्थित होते. यावेळी लालबागच्या राजाच्या वतीने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबीयांना पाच लाखांच्या अर्थसहाय्याचा धनादेश वितरीत करण्यात आला. तसेच अन्य हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका, हुतात्मा संजय राजपूत यांच्या पत्नी सुषमा, हुतात्मा नितीन राठोड यांच्या पत्नी वंदना आणि अन्य कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद समाजमाध्यमांतही उमटत आहेत. समाजमाध्यमांवरील चर्चेवर कनिका राणे यांनी नाराजी व्यक्त केली. सीमेवरील जवान स्वत:चे कर्तव्य बजावत असतात, याचे भान समाज माध्यमात व्यक्त होताना बाळगले पाहिजे. एखादी पोस्ट लाईक करणे किंवा शेअर करणे म्हणजे आपली जबाबदारी पार पाडणे नव्हे, असेही कनिका यांनी सुनावले.
पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हा संताप समजू शकतो. मात्र, सीमेवर आणि दहशतवाद्यांशी लढताना रोज जवान आपल्या प्राणांची आहुती देत आहेत. त्यांच्या बलिदानावर मात्र समाजातून कसलाच संताप व्यक्त होत नाही. मोठ्या संख्येने जवान शहीद झाले तरच आपण जागे होणार का, पुलवामात ४२ जवान गेले. परंतु चकमकीत शहीद होणा-या सैनिकांबद्दल आपल्या संवेदना का जाग्या होत नाहीत, असा सवाल करतानाच गेल्या वर्षी विविध चकमकीत ८० जवानांनी प्राणांची आहुती दिली. मात्र, आज त्यांचा समाजाला विसर पडल्याची खंत कनिका राणे यांनी व्यक्त केली.