मुंबई : भारतीय भाषांना साहित्य, संस्कृती, इतिहास व कलांचा समृद्ध वारसा आहे. मात्र जागतिकीकरणाच्या ओघात अनेक प्रादेशिक भाषांवर अतिक्रमण होताना दिसत आहे. आपल्या भाषांकडे दुर्लक्ष होणार नाही हे पाहणे सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासोबतच प्रादेशिक भाषा विशेषत: युवकांमध्ये लोकप्रिय करणे आवश्यक आहे. आज विदेशी भाषा शिकणे सोपे आहे; त्या भाषा शिकविणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत. मात्र प्रादेशिक भाषा शिकविणाऱ्या संस्था नाहीत. यासाठी विदेशी भाषांप्रमाणेच भारतीय भाषा शिकविणाऱ्या संस्था सुरू करणे गरजेचे असल्याचे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी केले.प्रियदर्शनी अकादमीतर्फे गुजराती, हिंदी, मराठी व सिंधी भाषेतील नामवंत लेखकांना राज्यपालांच्या हस्ते साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. अकादमीच्या वतीने २१५ विद्यार्थ्यांना या वेळी शिष्यवृत्ती देण्यात आली.लेखिका अरुणा ढेरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मृती मराठी साहित्य पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध लेखक हृदयेश मयंक (हिंदी), काजल रामचंदानी (सिंधी) व धिरू पारीख (गुजराती) यांनादेखील प्रियदर्शनी पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शायना एन.सी., प्रियदर्शनी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष नानिक रूपाणी, अध्यक्ष निरंजन हिरानंदानी व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्र्रतिनिधी)
भारतीय भाषा शिकविणाऱ्या संस्था सुरू करणार - राज्यपाल
By admin | Published: February 20, 2015 12:55 AM