लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विविध भारतीय बनावटीच्या उपग्रहांचे सिग्नल्स नोंदविणारी, त्यांचे भाषांतर करून भारताची जीपीएस यंत्रणा अधिक सक्षम करणारी भारतीय बनावटीची दिशादर्शनाचे संकेत प्राप्त करणारी चिप ‘ध्रुव’ची निर्मिती आयआयटी बॉम्बेचे प्रा. राजेश झेले आणि त्यांच्या चमूने केली आहे.
विविध देशांच्या जीपीएस, गॅलिलिओ, बायडू तसेच जीपीएससारख्या दिशादर्शक संकेतांचे एकाचवेळी भाषांतर व प्रसारण करण्याची क्षमता ध्रुवमध्ये आहे. केवळ १.८४ मिमी बाय १.८५ मिमी एवढ्या आकाराच्या या चिपवर आवश्यक त्या प्राथमिक चाचण्या आयआयटी प्रयोगशाळेत झाल्या असल्याची माहिती प्रा. झेले यांनी दिली. या चिपचे डिझाइन आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविले असून, १८ महिन्यांत त्यांनी हे काम पूर्ण केले आहे. पुढच्या टप्प्यात स्टार्टअपच्या मदतीने याची निर्मिती करून ते बाजारात आणण्याच्या प्रयत्न आहे. दरम्यान, त्यात आणखी सुधारणेचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून होत असून, सुधारित प्रकारात ही चिप आणखी छोट्या आकारात आणि सक्रिय अँटिनासारखी वैशिष्ट्ये त्यात समाविष्ट केली जातील, अशी माहिती चमूकडून देण्यात आली.
दैनंदिन जीवनातल्या दिशादर्शक प्रणालीसाठी आपण ज्या जीपीएस यंत्रणेचा वापर करतो त्या विविध देशांच्या आहेत. भारतीय बनावटीची एकही दिशादर्शक संकेत प्रणाली भाषांतर करू शकणारी चिप आतापर्यंत आपण निर्मित करू शकलो नव्हतो. त्यामुळे आपल्या उपग्रहांकडून येणाऱ्या सांकेतिक भाषेच्या भाषांतरासाठी आपण इतर यंत्रणेवर अवलंबून आहोत. मात्र, ध्रुवच्या सहाय्याने भारत अधिक सक्षम, सुरक्षित दिशादर्शक प्रणाली तयार करू शकणार आहे. - प्रा. राजेश झेले, आयआयटी, मुंबई
ध्रुवची वैशिष्ट्ये स्वदेशी बनावटीची, कमी खर्चातील, छोट्या आकारातील उपग्रह संकेत प्राप्त करणारी चिप. ध्रुव विविध प्रकारच्या दिशादर्शक संकेतांशी सहज जुळवून त्यांचे भाषांतर करू शकते. भारतात तुम्ही कुठे आहात हे सांगण्यासाठी या चिपचा वापर होऊ शकणार आहे. वैयक्तिक मोबाइल नेव्हिगेशन, व्हेइकल ट्रॅकिंग, रेल्वे, विमान, जहाजातील विविध यंत्रणांमध्येही याचा वापर होऊ शकेल.