IMD Issues Yellow Alert: राज्यभरात सध्या उष्णतेच्या झळांमधून नागरिक होरपळून निघत आहेत. मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नसली तरी उन्हाचा तडाखा जाणवत आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. उष्ण आणि दमट परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
रविवारी, मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत किमान २४ अंश सेल्सिअस आणि कमाल ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उकाड्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर आता भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे ११ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कमाल तापमानात हळूहळू ३-४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. भारतीय हवामान विभागाने या आठवड्यात मुंबईसह कोकणाच्या काही भागात उच्च तापमानाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तामपान जास्त होण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या यलो अलर्टनुसार ही उष्णता सामान्य लोकांसाठी सहन करण्यायोग्य आहे. पण लहान मुले, वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची चिंता निर्माण करू शकते. राज्यात एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेच्या लाटा येतात. पण अलिकडच्या वर्षांत, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे बऱ्याच आधीपासून तामपान वाढत असून उष्णता जास्त काळ टिकून राहत आहे.
दरम्यान, तापमान आणि आर्द्रता वाढल्यामुळे उष्णता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबईतल्या हवेत ५२ टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली. MD सांताक्रूझ येथील वेधशाळेत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस आणि किमान २४.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअस आणि किमान २५.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हवामान विभागाने पुढील २४ तास आकाश निरभ्र राहणार असून पावसाची शक्यता नसल्याचे म्हटलं.
दुसरीकडे, गेल्या आठवड्यात, आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी, या उन्हाळ्यात भारतातील बहुतेक भागात तीव्र उष्णतेची लाट येईल, देशातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचे म्हटलं होतं. "एप्रिल ते जून या कालावधीत, उत्तर आणि पूर्व भारताच्या बहुतेक भागांमध्ये, मध्य भारतामध्ये आणि वायव्येकडील मैदानी भागात सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त उष्णतेच्या लाट येण्याची अपेक्षा आहे," असेही मृत्युंजय महापात्रा म्हणाले.