मुंबई - सोमालिया किनारपट्टीवरील एका कारवाईत भारतीय नौदलाने ३५ समुद्री चाच्यांना पकडलं आहे. या समुद्री चाच्यांना घेऊन आयएनएस युद्धनौका सकाळी मुंबईत पोहचली. त्यानंतर या समुद्री चाच्यांना मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. ऑपरेशन संकल्प अंतर्गत भारतीय नौदलाने ही मोठी कामगिरी यशस्वी केली आहे. अरबी समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ला रोखण्यासाठी भारतीय नौदलाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यातून व्यापारी जहाजांना सुरक्षा दिली जाते.
नौदलाने सांगितले की, आयएनएस कोलकाता या युद्धनौकेतून पकडलेले ३५ समुद्री चाचे २३ मार्चला मुंबईत आणले आहेत. व्यापारी जहाज लुटणाऱ्या या टोळ्यांना मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. १५ मार्च रोजी जवळपास ४० तासांचे हे थरारक ऑपरेशन पार पाडले. भारतीय नौदलला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अरबी समुद्रात एमवी रुएन हे जहाज रोखण्यात आलं. या जहाजाचा वापर व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यासाठी केला जात होता. १५ मार्चला जहाजावर भारतीय नौदलाची करडी नजर होती असं त्यांनी सांगितले.
ज्यावेळी समुद्री चाच्यांच्या जहाजाने आयएनएस कोलकाता या भारताच्या युद्धनौकेला पाहिले तेव्हा त्यांनी मार्ग बदलला आणि सोमालिया किनारपट्टीच्या दिशेने जाऊ लागले. लुटारुंच्या जहाजावर हत्यारासह समुद्री चाचे तैनात होते. त्यांनी नौदलाच्या युद्धनौकेवर गोळीबार सुरू केला. तेव्हा भारतीय नौदलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्याची वेळ आणली असं भारतीय नौदलाने म्हटलं.
दरम्यान, भारतीय सैन्याच्या कारवाईत जहाजावर असलेले सर्व समुद्री चाचे गुडघ्यावर बसून सरेंडर केले. त्यानंतर ३५ समुद्री चाचे आणि १७ चालक यांना ताब्यात घेण्यात आले. या समुद्री चाच्यांना भारतीय नौदलाने आज मुंबईत आणले आणि स्थानिक मुंबईत पोलिसांच्या स्वाधीन केले. नौदलाच्या या ऑपरेशनमध्ये INS कोलकातासह INS सुभद्रा या युद्धनौकेचाही समावेश होता.