मुंबई - रात्रीपासून मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुर्ला, सायन परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. कुर्ल्यातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं असून, उपनगरीय रेल्वे सेवा मंदावली आहे. पुढच्या दोन दिवसात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
पावसामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कलमध्ये यांसारख्या सखल भागात पाणी साचलं आहे.
कुर्ला येथील एसबीएस मार्गावरील राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात पाणी घुसलं आहे. रात्री साडेबारा वाजल्यावाजून या परिसरात मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी भरले आहे. यावेळी नवाब मलिकांनी शिवसेनेला करुन दाखविलं असा उपरोधिक टोला हाणला आहे.
विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे रवींद्र वायकर राज्यमंत्री यांचा दावा आहे की, "मुंबईत पाण्याचा निचरा झाला आहे. जिथ सखल भाग आहे तिथे पाणी साचतेय इतकंच. महापालिकेन चांगले काम केले, पुन्हा मुंबई जनजीवन सुरळीत झाले आहे, रस्ते वाहतूक सुरु झालीय. सेना-भाजपा महापालिका व्यवस्थित चालवत आहे. विरोधक आरोप करतच राहतील"
पश्चिम द्रुतगती मार्गावर पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अंधेरी, खार, मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.