इंजिन बिघाडामुळे नौदलाची स्पीड बोट कंट्रोलबाहेर; ऐनवेळी वळल्यामुळे मोठा अनर्थ टळला
By मनीषा म्हात्रे | Updated: December 21, 2024 06:14 IST2024-12-21T06:12:09+5:302024-12-21T06:14:38+5:30
नीलकमल बोट दुर्घटनेत आतापर्यंत १०० जणांना वाचविण्यात यश आले. फेरी बोटीच्या मध्यभागी डिझेल टाकी असल्याने त्याला स्पीड बोट धडकली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती.

इंजिन बिघाडामुळे नौदलाची स्पीड बोट कंट्रोलबाहेर; ऐनवेळी वळल्यामुळे मोठा अनर्थ टळला
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नौदलाच्या स्पीड बोटीतील इंजिनाच्या ट्रायलदरम्यान त्यात बिघाड झाल्याने बोट नियंत्रणाबाहेर गेली. नौदल अधिकारी महेंद्रसिंग शेखावत यांनी पुढे येत स्टिअरिंगवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत बोट फेरीबोटीच्या मध्यभागी धडकणार नाही याची खबरदारी घेत ती वळवली. यात शेखावत यांचा जागीच मृत्यू झाला. फेरी बोटीच्या मध्यभागी डिझेल टाकी असल्याने त्याला स्पीड बोट धडकली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती.
नीलकमल बोट दुर्घटनेत आतापर्यंत १०० जणांना वाचविण्यात यश आले. १४ जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यातील जोहान पठाण अजूनही बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. कुलाबा पोलिसांनी आतापर्यंत १६ जणांचे जबाब नोंदवले आहे. स्पीड बोटीवरील ओईएम कंपनीच्या इंजिनियरसोबत हेल्पर म्हणून आलेला दीप किशोर निकोशे याच्या प्राथमिक चौकशीत ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. तसेच, त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
अखेर चालकाचे गूढ उकलले...
- नौदलाच्या स्पीड बोटीतील इंजिनाच्या ट्रायलसाठी नौदल अधिकारी शेखावत, कर्मवीर यादव हे ओईएम कंपनीचे कर्मचारी, इंजिनीयर टी. दीपक, मंगेश केळशीकर, प्रवीण शर्मा आणि हेल्पर निकोशेसह बोटीवर गेले. कर्मवीर यादव यांच्या हाती स्टिअरिंग होते. ट्रायलदरम्यान इंजिनात बिघाड झाल्याने आरपीएमवर (रोटेशन पर मिनिट) नियंत्रण झाले नाही. त्यामुळे बोटीवरील नियंत्रण सुटले.
- बोट समोरून जाणाऱ्या फेरी बोटीला धडकू नये, यासाठी शेखावतही पुढे आले. फेरी बोटीच्या मध्यभागी डिझेल टाकी असल्याने त्याला बोट धडकल्यास बोटीला आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते. तेच वाचविण्यासाठी नौदल अधिकाऱ्यांनी प्रयत्न करत बोट वळवून नीलकमलच्या कोपऱ्याहून घासत पुढे नेली. मात्र, ती धडकल्याने बोटीत पाणी शिरल्याने बोट बुडून दुर्घटना घडली.
- दुसरीकडे स्पीड बोटीवरील धडकेनंतर बचावासाठी पुढे आलेले शेखावत उडून नीलकमल बोटीला धडकून कोसळले. या भीषण धडकेत गंभीर जखमी झालेल्या शेखावत यांचा जागीच मृत्यू झाला. तर, यादव गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती स्थिर नसल्याने जबाब अद्याप नोंदविण्यात आलेला नाही.
नीलकमल बोट एलिफंटाला नेणार...
नीलकमल बोट घटनास्थळावरून भाऊच्या धक्क्याकडे लावली आहे. मात्र, तेथे गाळ असल्यामुळे ती स्थिर राहत नसल्याने तिला एलिफंटा येथे लावण्यात येणार आहे. त्यानंतर पंचनामा करणार आहे.
पुन्हा स्पीड बोटीत पडल्याने हेल्पर वाचला
बोटीच्या धडकेत हेल्पर दीप किशोर निकोशे हा उंच उडून पुन्हा स्पीड बोटीत पडल्याने तो बचावला. तो नागपूरचा रहिवासी असून, त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
...तर स्वतःचाही जीव वाचवला असता
नौदल कर्मचाऱ्यांच्या स्टंटबाजीमुळे अपघात झाल्याचा आरोप होत आहे. जर ही स्टंटबाजी असती तर नौदल अधिकाऱ्यांनी पाण्यात उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला असता. मात्र, त्यांनी फेरी बोटीवरील नागरिकांना हानी होऊ नये, यासाठी जीव धोक्यात घातल्याचे निकोशेच्या चौकशीत समोर आले. चाचणीसाठी प्रवासी बोटींचा नियमित मार्ग असलेला समुद्रातील तो भाग योग्य होता का, या दिशेने पोलिस तपास करत आहे. तसेच, नौदलाच्या चौकशी अहवालातून अपघातामागचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.
नाैदलाकडून ७२ तास सुरू राहणार शोधकार्य
फेरीबोट दुर्घटनेतील एक बालक अद्यापही सापडले नसल्याने शोधमोहीम सुरू आहे. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुरुस्ती पथकातील कर्मचाऱ्याने केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आल्याचे नौदलाचे कमांडर आणि जनसंपर्क अधिकारी मेहुल कर्णिक यांनी सांगितले.
हा अपघात नेमका कशामुळे घडला, अपघाताची कारणे काय होती, हे तपासण्यासाठी नौदलाने पश्चिम विभागीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू केली आहे. या जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नौदल प्रमुखांकडून आढावा
दुर्घटनेनंतर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. त्यांनी मृत आणि जखमीची माहिती घेतली. तसेच स्पीड बोट धडकल्याप्रकरणी नौदलाकडून सुरू असलेल्या चौकशीचाही त्यांनी आढावा घेतल्याची माहिती नौदलातील सूत्रांनी दिली. या संदर्भात अधिक तपशील मिळू शकला नाही. त्रिपाठी हे धावता दौरा करून दिल्लीला परतल्याने अधिक तपशील लवकरच स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.