मुंबई : माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. ‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट १७ ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी स्टेल्थ विनाशिका आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. सुदेश धनखड यांनी या युद्धनौकेचे नामकरण केले होते.
या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार यामिनी जाधव, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार आणि ‘एमडीएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि ‘एमडीएल’चे कर्मचारी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, ‘महेंद्रगिरी’ या निलगिरी श्रेणीतील सातव्या स्टेल्थ विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला आहे. निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसविण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे आणि प्रणाली एमएसएमईकडून खरेदी करण्यात आली आहेत.
युद्धनौकेची वैशिष्ट्ये...
‘महेंद्रगिरी’ हे नाव ओडिशा राज्याच्या पूर्व घाट परिसरातील पर्वत शिखराच्या नावावरून देण्यात आले आहे. प्रकल्प १७ ए फ्रिगेट्स श्रेणीतील ही सातवी युद्धनौका आहे. ही युद्धनौका प्रोजेक्ट १७ क्लास फ्रिगेट्स (शिवालिक क्लास)ची फॉलो-ऑन, अर्थात सुधारित आवृत्ती असून, यामध्ये सुधारित स्टेल्थ अर्थात विनाशिकेची वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि संवेदन प्रणाली आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत. ‘महेंद्रगिरी’ युद्धनौका ही तांत्रिकदृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे आणि ती भविष्यातील स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दिशेने पुढे जाताना, स्वतःच्या समृद्ध नौदल वारशाचा अभिमान बाळगण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे.
या जहाजाचे बांधकाम वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये केले गेले आहे आणि त्यानंतर माझगाव डॉक्स लि. येथे स्लीपवेवर त्याचे एकत्रीकरण आणि उभारणी करण्यात आली आहे. ‘महेंद्रगिरी’च्या बांधणीची पायाभरणी २८ जून २०२२ रोजी करण्यात आली होती. ही युद्धनौका फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रत्यक्ष कामगिरीसाठी प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. अंदाजे ३४५० टन वजनाचे हे जहाज भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होईल.