मुंबई : यंदा उन्हाळी सुट्यांचा कार्यक्रम तुम्ही ठरविला नसेल, तर लक्षात असू द्या की, जगातील २५ देशांत भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसामुक्त प्रवेश असून, ३९ देशांत ‘व्हिसा आॅन अरायव्हल’ची सुविधा आहे. २0१९ च्या पासपोर्ट निर्देशांकात भारतीय पासपोर्टला ६७ वे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी तो ६८ व्या स्थानी होता. गेल्या पाच वर्षांत भारतीय पासपोर्टने १0 स्थानांची प्रगती केली आहे. २0१५ मध्ये तो ७७ व्या स्थानी होता.यंदाच्या स्थितीनुसार जगातील १३४ देशांत प्रवेश करण्यासाठी भारतीयांना व्हिसा लागतो. तरीही जाणकार म्हणतात की, भारतीय प्रवाशांची पैसे खर्च करण्याची क्षमता आणि स्वदेशी परतण्याची हमी यामुळे अधिकाधिक देश त्यांच्यासाठी दरवाजे खुले करीत आहेत. कॉक्स अँड किंग्ज लि.चे रिलेशनशिप विभागाचे प्रमुख करण आनंद यांनी सांगितले की, विदेशी सरकारांना भारतीय प्रवाशांबाबत संशय वाटत नाही. भारतीय लोक चैन आणि व्यवसायासाठी विदेशात जातात.आणि उद्देश साध्य झाल्यानंतर मायदेशी परततात, याची सरकारांना खात्री वाटते. सूत्रांनी सांगितले की, इस्रायल, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब आमिरात यासारख्या देशांच्या तुलनेत मात्र भारत अजून खूप पिछाडीवर आहे. इस्रायली नागरिकांना १४६ देशांत व्हिसामुक्त प्रवेश मिळतो.
भारतीय पासपोर्टधारकांना तब्बल २५ देशांत मिळतो व्हिसामुक्त प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 8:00 AM