Join us  

भारतीय टपाल बँक मार्च २०१७ पर्यंत कार्यान्वित होणार

By admin | Published: January 10, 2016 1:35 AM

मार्च २०१७पर्यंत भारतीय टपाल बँक कार्यान्वित होईल ज्याद्वारे ग्रामीण भागात औपचारिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय दळणवळण आणि

मुंबई : मार्च २०१७पर्यंत भारतीय टपाल बँक कार्यान्वित होईल ज्याद्वारे ग्रामीण भागात औपचारिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिले. परळ येथे शनिवारी ई-कॉमर्स पार्सल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जगातील आघाडीचा ई-कॉमर्स वितरण मंच बनण्याची क्षमता भारतीय टपाल खात्यात असल्याचेही याप्रसंगी रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले. या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्र विभागाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अशोक कुमार दास, डाक विभागाचे पोस्ट मास्टर जनरल व्ही.के. गुप्ता, व्यापार विभागाचे पोस्ट मास्टर जनरल राकेश कुमार, मुंबई विभागाचे पोस्ट मास्टर जनरल रणजीत कुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील सर्व टपाल कार्यालयांत बँकिंग, विमा कारभार तसेच सरकारी योजनांचा प्रसार करण्यासाठी हँड होल्ड उपकरण देण्यात येतील, असेही ते म्हणाले. परळ येथील १२ हजार चौरस फूट आणि पूर्णत: यांत्रिकीकरण आणि संगणकीकरण करण्यात आलेल्या या केंद्रात कन्व्हेयर बेल्ट, स्कॅनर, संगणक आणि इलेक्ट्रॉनिक वजन मशिन्स यांचा वापर करण्यात येईल. मुंबई विमानतळावरून भारतातील सर्व ठिकाणी पार्सल बॅग्ज पाठविण्यासाठी विशिष्ट वाहतूक व्यवस्थाही पुरवण्यात येईल. सध्या येथे प्रायोगिक तत्त्वावर सुमारे ७ हजार ई-कॉमर्स पार्सल्सवर प्रक्रिया करण्यात येत आहे. या केंद्रात दरदिवशी तीन पाळ्यांत ३० हजार ई-कॉमर्स पार्सल हाताळण्याची क्षमता आहे. या मुंबईतील २१ टपाल कार्यालयांत चार प्रमुख विशिष्ट यांत्रिकी केंद्राद्वारे वेगाने पार्सल पोहोचतील हे निश्चित करण्यात आले आहे. मुंबईतील उर्वरित टपाल कार्यालयाचाही लवकरच या योजनेत अंतर्भाव करण्यात येईल.११ हजार ६३६ कोटी रुपयांचा महसूल पार्सलपासून मिळणाऱ्या महसुलात 2013-14 या वर्षात २ टक्के घट झाल्याचे दिसून आले. 2014-15मध्ये ३७% तर २०१५-१६ या आर्थिक वर्षातल्या पूर्वार्धात ११७ टक्के वाढ झाल्याचे ते म्हणाले. टपाल खात्याच्या ११ हजार ६३६ कोटी रुपयांच्या एकूण महसुलापैकी टपाल आणि पार्सलशी संबंधित महसूल हा एकूण महसुलाच्या ४२ टक्के आहे व उर्वरित महसूल बचत बँक खात्यातून प्राप्त झालेला आहे.