Join us

भारतीय रेल्वे मंत्रालयाची जाहिरात, लोको पायलटच्या ५६९६ जागा; राज यांचे मनसैनिकांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 9:44 AM

भारतीय रेल्वे विभाग 'सहाय्यक लोको पायलट'च्या विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.

मुंबई: भारतीय रेल्वे विभाग 'सहाय्यक लोको पायलट'च्या विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५६९६ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वे लोको पायलट भारती २०२४साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून विविध वृत्तपत्रात जाहिरात देखील देण्यात आल्या आहे. 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज ट्विट करत या भरतीसाठी तरुणांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील मनसैनिकांना केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं, असं राज ठाकरेंनी सांगितले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग यासाठी तत्पर आहेच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं, अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या. तसेच जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.  

दरम्यान, भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट IndianRailways.gov.in ला भेट द्यावी. उमेदवारांनी होमपेजवरील लोको पायलट भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करून अर्ज करावा. अर्जामध्ये योग्य माहिती प्रविष्ट करून अर्ज दाखल करा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्जाची फी भरा. यानंतर दाखल केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या. उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये करण्यात येईल. यामध्ये संगणक आधारित चाचणी (CBT),  संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT), आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश आहे.

टॅग्स :राज ठाकरेभारतीय रेल्वेकर्मचारीनोकरीमहाराष्ट्र