मुंबई : मी हस्तक्षेप केला नसता, तर मुलगा जगण्याची शक्यता नव्हती. मी ट्रॅकवर १०० मीटरपर्यंत वेगाने पळत गेलो. मुलाला उचलले आणि ट्रेन जवळ येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर चढलो. मी त्याला वाचविण्याचा दृढ निश्चय केला होता. भारतीय रेल्वेने बरेच काही दिले आहे आणि मी जे केले, ते माझे कर्तव्य होते, असे पॉईंट्समन मयूर शेळके याने सांगितले. मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा तनुजा कंसल यांनी पॉइंट्समन मयूर शेळके याचा सत्कार केला, त्यावेळी तो बोलत होता.
मयूर शेळके याने वांगणी रेल्वेस्थानकात सहा वर्षाच्या मुलाचा जीव वाचविला. विशेष उद्यान एक्स्प्रेस येत असलेल्या रेल्वे ट्रॅकवर हा मुलगा घसरून पडला होता. कंसल म्हणाल्या की, ‘स्वत:चा जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी कृत्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत’. यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि सीआरडब्ल्यूडब्ल्यूओकडून कौतुक म्हणून २ हजार रुपये रोख पुरस्कार दिला. रेल्वे परिवाराचा एक भाग म्हणून अशा उदात्त व्यक्तींचा मला अभिमान वाटतो. सीआरडब्ल्यूडब्ल्यूओच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनीही त्यांच्या या नि:स्वार्थ कृत्याबद्दल कौतुक केले.