Join us  

भारतीय ‘हुशार’, अमेरिकन ‘ढ’ - जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2015 2:03 AM

भारतीयांएवढे जगात कोणीच ‘मल्टिटास्किंग’ नाही. भारतीय कायमच ‘हुशार’ असून, अमेरिकन ‘ढ’ आहेत. आपण एखादी गोष्ट ज्या सहज आणि सोप्या पद्धतीने करतो, ती गोष्ट अमेरिकेतील

मुंबई : भारतीयांएवढे जगात कोणीच ‘मल्टिटास्किंग’ नाही. भारतीय कायमच ‘हुशार’ असून, अमेरिकन ‘ढ’ आहेत. आपण एखादी गोष्ट ज्या सहज आणि सोप्या पद्धतीने करतो, ती गोष्ट अमेरिकेतील व्यक्तींना खूप कठीण वाटते. त्यामुळे परदेशातून पुन्हा भारतात येणाऱ्यांनी आपण स्वदेशी येऊन उपकार करत आहोत, ही भावना बाळगू नये, हे अत्यंत चुकीचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.मुंबई मराठी साहित्य संघ आणि रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर आयोजित १२ व्या महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन गुरुवारी पार पडले. ‘ब्रेनड्रेन - स्वप्न आणि वास्तव’ या विषयावर आधारित परिसंवादाच्या अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते. यावेळी या परिसंवादात डॉ.अश्विनी भालेराव-गांधी, डॉ.भूषण केळकर आणि प्रशांत कऱ्हाडे यांनी आपले विचार मांडले.अध्यक्षीय भूमिका मांडताना डॉ. जाधव म्हणाले की, ‘आपल्याकडे हुशार लोकांची संख्या कमी नाही, त्यामुळे त्यातील काही परदेशी गेल्याने काहीच फरक पडत नाही. या उलट जे स्वदेशी परत येतात, त्यांनी स्वत:हून आले असे न भासवता, अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळल्याने अमेरिकने त्यांना मायदेशी धाडलेले असते, हे लक्षात घ्यावे.’ तर डॉ.अश्विनी भालेराव- गांधी यांनी आपल्याकडे ‘सुपर स्पेशालिटी’ तंत्रज्ञानाचा आजही अभाव असल्याने डॉक्टर्सचा ओढा परदेशी वळत असल्याचे निरीक्षण नोंदविले, तसेच भारतातील तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत होण्याची गरजही व्यक्त केली. डॉ. केळकर यांनी ‘ब्रेनड्रेन’ विषयी स्वानुभव सांगून विद्यार्थ्यांचे गैरसमज दूर केले. शिवाय या संकल्पनेची व्याख्या आता बदलते आहे, असेही सांगितले. तर प्रशांत कऱ्हाडे यांनी परदेशात शिक्षण आणि नोकरीसंबधी आपल्या ढोबळ कल्पना - विचार दूर करण्याचे सुचविले. परदेशात गेल्यावर आपली मानसिकता बदलते, त्यामुळे विचारांवर याचा काहीसा परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)