Join us

भारतीय विद्यार्थ्यांची पसंती साहेबांच्या देशाला, उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियापेक्षा इंग्लंडला जाण्याला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 8:38 AM

Education: अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षे काम करण्याची मुभा, परदेशी विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन यामुळे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे.

- रेश्मा शिवडेकर मुंबई  - अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षे काम करण्याची मुभा, परदेशी विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन यामुळे उच्च शिक्षणासाठीइंग्लंडला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. कॅनडा, अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जात असत. परंतु, भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत करणाऱ्या देशांत तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला मागे सारून इंग्लंडने आपले स्थान बळकट केले आहे.

इंग्लंडमध्ये पदवी वा पदव्युत्तर आणि पीएच. डी.चे शिक्षण घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना अनुक्रमे दोन आणि तीन वर्षे तिथे राहून काम (वर्क व्हिसा) करण्यासाठीचा व्हिसा मिळतो. कोविड काळात कमी झालेली परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी २०२१पासून इंग्लंडने हे धोरण अवलंबले. तेव्हापासून भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे.

 ऑस्ट्रेलियाची पीछेहाट  गेल्या पाच वर्षांत कॅनडात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर २०१९ सालापासून भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची मात्र गेली तीन वर्षे पीछेहाट होत आहे. तशीही ऑस्ट्रेलियाची धोरणे परदेशी विद्यार्थ्यांबाबत फारशी अनुकूल नाहीत. कॅनडा आणि इंग्लंडमधील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या मात्र झपाट्याने वाढते आहे. इंग्लंडमध्ये उच्चशिक्षणासाठी जाणाऱयांमध्ये भारतीयच नव्हे तर एकूण परदेशी विद्यार्थ्यांचा कल आहे.

कॅनडात कामाची संधीकॅनडात सहजपणे काम उपलब्ध होत असल्याने डिप्लोमासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तिथे अनेक जुनी विद्यापीठे याकरिता खासगी महाविद्यालयांशी टायअप करत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना अनुकूल अशी धोरणे अवलंबली जात आहेत.

इंग्लंडमध्ये एक तृतीयांश भारतीय विद्यार्थीजून २०२३मध्ये इंग्लंडने जवळपास १,४३,८४८ भारतीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी स्वागत केले होते. ही संख्या इंग्लडंमधील त्यावेळच्या एकूण परदेशी विद्यार्थी संख्येच्या एक तृतीयांश होती.

२०२२मध्ये कॅनडाच्या खालोखाल अमेरिकेत भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने जात होते. सध्या भारत आणि कॅनडातील राजनयिक (डिप्लोमॅटिक) संबंध तणावाचे असले, तरी त्याचा भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.- मारिया मथाई, संचालक, एम. एम. ॲडव्हायझरी, अहवाल प्रकाशक

इंग्लंडमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ४९.६ टक्के इतकी वाढ झाली आहे.      त्या खालोखाल कॅनडात (४६.८ टक्के) भारतीय विद्यार्थी जातात.     अमेरिकेत १८.९ टक्के वाढ आहे.     ऑस्ट्रेलियात ही वाढ अवघी ०.७ टक्के आहे.

टॅग्स :शिक्षणभारतइंग्लंडआॅस्ट्रेलिया