Join us

भारतीय नागरिकाच्या घटस्फोटाचा आदेश परदेशी कोर्टाला देण्याचा अधिकार नाही- मुंबई उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 12:51 PM

परदेशात राहणा-या भारतीय दाम्पत्याचा घटस्फोट करून देण्याचा अधिकार विदेशी न्यायालयाला नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.

मुंबई, दि. 21 - परदेशात राहणा-या भारतीय दाम्पत्याचा घटस्फोट करून देण्याचा अधिकार विदेशी न्यायालयाला नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. एखाद्या दाम्पत्याचे लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार झाल्यास त्याला विदेशी न्यायालय घटस्फोट मिळवून देऊ शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दुबईस्थित एका व्यक्तीच्या घटस्फोटाला तिथल्या स्थानिक न्यायालयानं मंजुरी दिली होती. त्याविरोधात त्याच्या पत्नीनं मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात दाद मागितली होती.परंतु कौटुंबिक न्यायालयाने तिने स्वत: व मुलांसाठी मागितलेली पोटगीची मागणी फेटाळली होती. त्याला तिनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्या. व्ही.एस. ओक आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टानं दुबईच्या न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. दुबईचे नागरिक असल्याचा पतीचा दावा असला तरी त्याच्याकडे यासंबंधी काहीच ठोस पुरावे नाहीत. पती आणि पत्नी दोघेही भारतीय व जन्माने हिंदू आहेत. त्यांनी हिंदू रीतीरिवाजानुसार लग्न केले आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाचा मुद्दा हा हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत येतो. त्यामुळे हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींनुसार याचिकेवर सुनावणी करण्याचा दुबई न्यायालयास काहीच अधिकार नसल्याचंही मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. पत्नीने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने नव्याने कौटुंबिक न्यायालयाकडे वर्ग केली आहे. पती-पत्नीला आगामी 18 सप्टेंबरपर्यंत कौटुंबिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नीपासून विभक्त होण्यासाठी विरारमध्ये राहणा-या एका इसमाने फॅमिली कोर्टात प्रेयसीला पत्नी दाखवून घटस्फोट घेतल्याचे एक अजब प्रकरण समोर आले होते. पत्नीने देखभाल खर्च आणि संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी पतीला फॅमिली कोर्टात खेचले तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. विरार येथे राहणा-या तृप्तीचा अमित पंडित याच्याबरोबर विवाह झाला होता. पण पती-पत्नीच्या नात्यात वारंवार खटके उडत असल्याने तृप्तीने अखेर कोर्टाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तृप्तीला अमित पंडित तिचा पती नसल्याची धक्कादायक बातमी समजली. हे कसे शक्य आहे असा प्रश्न तिला पडला. कोर्टाच्या नोंदीनुसार 2007 मध्येच तिने अमितपासून घटस्फोट घेतला होता. अधिक चौकशी केली असता अमित पंडितने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने हा बनावट घटस्फोट घडवून आणल्याचे समोर आले. खासगी कंपनीत अधिकारी असलेल्या 45 वर्षीय अमित पंडित विरोधात बीकेसी पोलीस स्थानकात बांद्रा फॅमिली कोर्टाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :मुंबई हायकोर्ट