पाकिस्तानात जन्मलेल्याला पासपोर्टशिवाय भारतीय व्हिसा
By Admin | Published: December 22, 2016 06:05 AM2016-12-22T06:05:09+5:302016-12-22T06:05:09+5:30
पाकिस्तानात जन्मलेल्या व्यक्तीकडे पाकिस्तानचा पासपोर्ट नसतानाही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्याला भारतीय व्हिसा
मुंबई : पाकिस्तानात जन्मलेल्या व्यक्तीकडे पाकिस्तानचा पासपोर्ट नसतानाही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्याला भारतीय व्हिसा दिल्याची धक्कादायक बाब बुधवारी उच्च न्यायालयात उघडकीस आली. उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत याबाबत चौकशी करण्याची सूचना संबंधित प्राधिकरणाला दिली आहे.
असिफ अब्बास कराडिया (४९) पाकिस्तानात जन्मला. जन्मल्यानंतर काही महिन्यांतच त्याला त्याच्या पालकांनी भारतात आणले. त्याच्या पालकांकडे भारतीय नागरिकत्व आहे. मात्र असिफकडे पाकिस्तान किंवा भारताचे नागरिकत्व नसल्याने त्याने पाकिस्तान सरकारला नागरिकत्व देण्यासंदर्भात अर्ज केला होता.
तसेच पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला. मात्र पाक सरकारने याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. दरम्यानच्या काळात त्याने परराष्ट्र मंत्रालयाकडून व्हिसा मिळवला. मात्र जून २०१६ मध्ये त्याला संबंधित प्रशासनाने नोटीस बजावून त्याचा पासपोर्ट व अन्य कागदपत्रे सादर करा अन्यथा देश सोडून जा, असे स्पष्ट सांगितले. या नोटीसविरुद्ध असिफने उच्च न्यायालयात याचिका केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.
गेली ४९ वर्षे मी भारतात राहात असून माझ्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड व अधिवास प्रमाणपत्र आहे. तरीही भारत सरकार मला नागरिकत्व बहाल करत नाही. संबंधित प्रशासनाने माझ्या अर्जावर अद्याप निर्णय घेतला नाही. जोपर्यंत भारत सरकार यावर निर्णय घेत नाही, तोपर्यंत माझ्या व्हिसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी विनंती असिफने उच्च न्यायालयाला केली. (प्रतिनिधी)