बँकॉक, फ्रँकफर्ट येथूनही भारतीयांना मिळणार अमेरिकी व्हिसा; यंदा दहा लाख व्हिसा जारी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 05:55 AM2023-05-11T05:55:22+5:302023-05-11T05:56:19+5:30
भारतीयांना व्हिसासाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती अमेरिकेचे प्रिन्सिपल डेप्युटी असिस्टंट सेक्रेटरी हुगो रॉड्रिग्ज यांनी दिली.
मुंबई : अमेरिकेचा व्हिसा काढण्यासाठी भारतीयांची वाढती संख्या लक्षात घेता आता बँकॉक आणि फ्रँकफर्ट येथील अमेरिकी व्हिसा कार्यालयातही भारतीयांसाठी विशिष्ट वेळ राखून ठेवण्यात आली असून, तेथून भारतीयांना व्हिसासाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती अमेरिकेचे प्रिन्सिपल डेप्युटी असिस्टंट सेक्रेटरी हुगो रॉड्रिग्ज यांनी दिली. ते सध्या भारताच्या दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.
रॉड्रिग्ज म्हणाले की, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटन अशा सर्वच श्रेणीतील अमेरिकी व्हिसासाठी प्रचंड मागणी असून, गेल्या वर्षी विविध व्हिसा श्रेणीअंतर्गत १२ लाख भारतीयांनी अमेरिकेला भेट दिली. अमेरिकेला भेट देणाऱ्या परदेशी लोकांत भारतीयांचे प्रमाण लक्षणीय असून, २०२३ या वर्षात विविध श्रेणीअंतर्गत तब्बल १० लाख व्हिसा जारी करण्यात येणार आहेत. कोरोनाकाळात व्हिसा देण्याच्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे मोठा अनुशेष निर्माण झाला होता. मात्र, २० पेक्षा जास्त व्हिसा श्रेणीमध्ये कोरोनापूर्वीप्रमाणेच व्हिसा जारी करण्यात येत असून, आता पर्यटन व्हिसासाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यावर आमचा भर असल्याचे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
अन्य देशांतूनही मिळेल अमेरिकेचा व्हिसा
भारतात व्हिसासाठी मोठी गर्दी आहे. मात्र, अन्य देशांतील अमेरिकेच्या व्हिसा कार्यालयातूनही भारतीयांना व्हिसा प्राप्त करून घेता येऊ शकतो. काही देशांमधून अमेरिकेच्या व्हिसासाठी प्रतीक्षा नाही. व्हिसासाठी अशा देशांतील कार्यालयांची निवड केली तर तेथून व्हिसा लवकर प्राप्त होऊ शकतो.
२०२३ या वर्षामध्ये पर्यटनासाठी व्हिसा देण्याच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये ६० टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेचा व्हिसा जलद मिळावा यासाठी ‘यूएस मिशन टू इंडिया’ याअंतर्गत सेवासुविधा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ आदींमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर व्हिसा जारी करण्याचे काम यंदा होईल.
- हुगो रॉड्रिग्ज, अमेरिकेचे प्रिन्सिपल डेप्युटी असिस्टंट सेक्रेटरी
गेल्या वर्षी सव्वालाख विद्यार्थ्यांना मिळाला व्हिसा
अमेरिकेला शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या तब्बल सव्वालाख भारतीय विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी अमेरिकेचा व्हिसा जारी करण्यात आला आहे. शिक्षणासाठी अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांत भारतीय विद्यार्थी आता दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
अन्य देशांतूनही मिळेल अमेरिकेचा व्हिसा
भारतात व्हिसासाठी मोठी गर्दी आहे. मात्र, अन्य देशांतील अमेरिकेच्या व्हिसा कार्यालयातूनही भारतीयांना व्हिसा प्राप्त करून घेता येऊ शकतो. काही देशांमधून अमेरिकेच्या व्हिसासाठी प्रतीक्षा नाही. व्हिसासाठी अशा देशांतील कार्यालयांची निवड केली तर तेथून व्हिसा लवकर प्राप्त होऊ शकतो.