Join us

भारताचे १७ ड्रायव्हर्स ट्रक रेसिंगसाठी सज्ज

By admin | Published: March 04, 2016 2:07 AM

रेसिंग चाहत्या क्रीडाप्रेमींसाठी या महिन्यात मोठी पर्वणी असून, टी-१ प्राइमा ट्रक रेसिंग या भारतातील एकमेव ट्रक रेसिंगचे तिसरे

मुंबई : रेसिंग चाहत्या क्रीडाप्रेमींसाठी या महिन्यात मोठी पर्वणी असून, टी-१ प्राइमा ट्रक रेसिंग या भारतातील एकमेव ट्रक रेसिंगचे तिसरे पर्व २० मार्चला दिल्ली (नोएडा) येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय ड्रायव्हर्स यंदाच्या सत्रातील मुख्य आकर्षण असणार आहे. यानिमित्ताने प्रथमच भारतीय ड्रायव्हर्स ट्रक रेसिंगमध्ये पदार्पण करताना प्रथमच महामार्गाऐवजी थेट रेसिंग ट्रॅकवर आपले कौशल्य दाखवतील.या स्पर्धेत भारतीयांना संधी मिळावी, यासाठी आयोजकांनी देशभरातील सुमारे ५०० हून अधिक ट्रक डायव्हर्सची निवड चाचणी घेतली होती. त्यातील अव्वल १७ ड्रायव्हर्सची प्राइमा ट्रक रेसिंगसाठी निवड झाली असून, बुधवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात या ड्रायव्हर्सची आयोजकांनी घोषणा केली. दरम्यान, या शर्यतीसाठी मुख्य आयोजकांनी आपल्या टी१ या विशेष ट्रकचे अनावरण करताना, यामध्ये रेसिंगच्या दृष्टीने करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. सुपर क्लास आणि प्रो क्लास अशा दोन गटांमध्ये होणाऱ्या या शर्यतीमध्ये, भारतीय ड्रायव्हर्सचा समावेश सुपर क्लासमध्ये असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत ड्रायव्हर्स प्रो क्लास गटातून सहभागी होतील. रेसिंगसाठी निवडलेल्या १७ ड्रायव्हर्सपैकी १२ ड्रायव्हर्सची मुख्य शर्यतीसाठी निवड होणार असून, सर्व ड्रायव्हर्स प्रथमच ट्रक रेसिंगमध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, सर्व जण मालवाहू ट्रकचे चालक असून, प्रथमच अत्याधुनिक रेसिंग ट्रक चालवत असल्याने, हा उपक्रम अत्यंत आव्हानात्मक असून, आम्हाला खूप शिकण्यास मिळत असल्याची प्रतिक्रिया या ड्रायव्हर्सकडून मिळत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)प्रो क्लास गटामध्ये १२ आंतरराष्ट्रीय ड्रायव्हर्सचा समावेश असून, भारतीय गटांमध्ये सय्यद अक्रम पाशा, नागार्जुना ए. (दोघेही बंगळुरू), पदमसिंग भाटी, भाग चंद, रघुवीर सिंग, मोहम्मद इलियास (सर्व जोधपूर), मोहम्मद परवेझ, राजकुमार महातो, गोबिंद सिंग (सर्व कोलकाता), बच्चू सिंग, जितेंदर सिंग (दोघेही जयपूर), रबिंदर यादव, बिकास महातो (दोघेही जमशेदपूर), मलकीत सिंग, जगत सिंग, आनंद (सर्व गुडगाव) आणि शंकर सिंग (दिल्ली) या १७ जणांचा समावेश आहे.