भारताची लक्षवेधी डर्ट बाइक ‘क्वीन’

By admin | Published: November 24, 2014 01:18 AM2014-11-24T01:18:05+5:302014-11-24T01:18:05+5:30

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या डर्ट बाइक सुपरक्रॉस स्पर्धेचा पहिला भाग नुकताच नाशिक येथे पार पाडला. या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मुलुंडच्या सायना कौर विर्दीने

India's Dirt Biking 'Queen' | भारताची लक्षवेधी डर्ट बाइक ‘क्वीन’

भारताची लक्षवेधी डर्ट बाइक ‘क्वीन’

Next

रोहित नाईक, मुंबई
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या डर्ट बाइक सुपरक्रॉस स्पर्धेचा पहिला भाग नुकताच नाशिक येथे पार पाडला. या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मुलुंडच्या सायना कौर विर्दीने. दखल घेण्याची बाब म्हणजे संपूर्ण भारतातून सायना ही एकमेव महिला डर्ट बाइक रायडर असून, ती सर्वच पुरुष प्रतिस्पर्ध्यांना आपल्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडत आहे.
अवघ्या १५ वर्षांची असलेली सायना तुफान वेग आणि अप्रतिम कौशल्यांद्वारे अनेक कसलेल्या बाइकर्सना पिछाडीवर टाकत आहे. त्यामुळे भारतात कोणतीही डर्ट बाइक रेस स्पर्धा होत असताना सायना नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरते.
पवई येथील एस. एम. शेट्टी कॉलेजमध्ये ११वी कॉमर्सला शिकत असलेली सायना वडील सर्वजीत सिंग विर्दी यांच्याकडून प्रेरित होऊन बाइक रेसिंगकडे वळली. सर्वजीत हे स्वत: उत्तम बाइक रेसर असल्याने सायनाला रेसिंगचे प्राथमिक धडे घरातूनच मिळाले. आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सायनाने अनपेक्षित कामगिरी करताना अनेकांचे लक्ष वेधले. २०१३ साली मुंबईत आणि त्यानंतर २०१४ साली कोईम्बतूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारताना सायनाने चांगली झुंज दिली. विशेष म्हणजे सायनाचा भाऊ अश्विंदर सिंगसुद्धा या खेळामध्ये कसलेला असून त्याच्या अनुभवाचा फायदा सायनाला मदतीचा ठरतो.
क्रीडा क्षेत्रातील या हटके खेळाकडे वळलेल्या सायनाने सांगितले की, माझे वडील उत्तम बाइकर असल्याने लहानपणापासूनच मला बाइक आणि डर्ट बाइक रेसविषयी आकर्षण होते. माझी उत्सुकता पाहून वडिलांनी बाइक चालवण्याची परवानगी दिली. माझा भाऊ अश्विंदरची प्रत्येक वेळी मदत होत असल्याने कामगिरी चांगली होते. तरी वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच आज इथपर्यंत पोहोचू शकले.

Web Title: India's Dirt Biking 'Queen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.