Join us  

देशाची अर्थव्यवस्था कोसळलीय, श्रीलंकेसारखी परिस्थिती इथंही होईल; संजय राऊतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:53 AM

राम मंदिरासाठी आजवर रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. त्यानंतर राम मंदिर उभं राहत आहे. देशानं आता धार्मिक मुद्द्यावर नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षा, महागाई, बेरोजगारी याकडे पाहायला हवं.

मुंबई

राम मंदिरासाठी आजवर रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. त्यानंतर राम मंदिर उभं राहत आहे. देशानं आता धार्मिक मुद्द्यावर नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षा, महागाई, बेरोजगारी याकडे पाहायला हवं. आज देशाचा रुपया ७७ डॉलर इतक्या ऐतिहासिक पातळीवर आला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळत आहे. लोकांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे यावर बोलणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राऊतांनी यावेळी श्रीलंकेतील परिस्थितीचा दाखला दिला. 

"श्रीलंकेतही सत्ताधारी 'अच्छे दिन'चं स्वप्न दाखवून सत्तेत आले होते. आज तिथं लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि सत्ताधाऱ्यांना बदडत आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेले आहेत. त्यांची घरं जाळून टाकत आहेत. श्रीलंकेत जी अवस्था निर्माण झालीय ती परिस्थिती जर भारतात येऊ नये असं वाटत असेल तर लोकांच्या प्रश्नावर सरकारनं लक्ष द्यायला हवं. देशाची अर्थव्यवस्था आज कोसळली आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात श्रीलंकेप्रमाणे भारतातील रस्त्यावरही अशीच परिस्थिती निर्माण झाली तर इथं काहीही होऊ शकतं. तिथल्यापेक्षा वाईट परिस्थिती इथं निर्माण होऊ शकते. जर लक्ष दिलं गेलं नाही तर श्रीलंका, कोलंबोसारखी परिस्थिती इथं होईल", असं संजय राऊत म्हणाले. 

राज ठाकरेंनी स्टंटबाजी बंद करावीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आल्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला आहे. धमकीची अशी शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. महाराष्ट्रात कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे स्टंटबाजी सोडा आणि लोकांच्या प्रश्नांवर बोला, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. 

"महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे त्यामुळे इथं कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. अशा धमकीची शेकडो पत्र शिवसेना भवनात रोज येत असतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कुणाची काय हिंमत कुणाला हात लावायची. इथलं गृहखातं सक्षम असून प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे स्टंटबाजी सोडा महाराष्ट्र पूर्णपणे सुरक्षित आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतनरेंद्र मोदीश्रीलंका