देशातील पहिली ड्रोन रेस मुंबईत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 02:55 AM2018-04-22T02:55:46+5:302018-04-22T02:55:46+5:30
या स्पर्धेत १० वर्षांच्या लहान मुलांपासून ४५ वर्षांपर्यंतच्या प्रौढ खेळाडूंनी भाग घेतला.
मुंबई : देशातील पहिल्या ड्रोन रेसला लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमध्ये शनिवारी सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत बच्चेकंपनीला १५ मिनिटांत ड्रोन कसा तयार करायचा, याबाबतचे मोफत मार्गदर्शन करण्यात येत होते. मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी असली, तरी कमी क्षमतेच्या ड्रोनसाठी मर्यादित जागेत उडवण्याची परवानगी घेतल्याचे आयोजक श्रीपाल मोरखिया यांनी सांगितले.
या स्पर्धेबाबत ते म्हणाले की, या स्पर्धेत १० वर्षांच्या लहान मुलांपासून ४५ वर्षांपर्यंतच्या प्रौढ खेळाडूंनी भाग घेतला. दोन गटांत स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमुळे ड्रोन निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. मुंबईतील स्पर्धेनंतर नवी मुंबई, हैदराबाद अशा विविध ठिकाणी या स्पर्धा पार पडणार आहेत.
त्यानंतर राज्याच्या पर्यटन विभागाच्या मदतीने एक आंतरराष्ट्रीय ड्रोन रेसचे आयोजन केले जाईल. त्यातून निवड होणाºया ड्रोनचालकाची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केली जाईल.
कशी असते ड्रोन रेस?
ड्रोन रेस मोटर रेसिंगप्रमाणे, मात्र हवेत खेळली जाते. मैदानात मोठमोठे चौकोनी किंवा वर्तुळाकार बॉक्सचे अडथळे ठेवून त्यांमधून वेगाने ड्रोन पळवावे लागतात.
लहान मुलांचे ड्रोन कमी क्षमतेचे आणि मोठ्यांचे ड्रोन उच्च क्षमतेचे असतात, जे साधारणत: १२० किमी प्रति तास या वेगाने उड्डाण घेतात.
एफपीव्ही चश्मे घालून ड्रोनचालक (पायलट) कॅमेरा असलेले ड्रोन उडवतात. त्या वेळी पायलटच्या डोक्यावर माउंटेड डिस्प्ले असतो. त्यामुळे ड्रोनचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांना घरबसल्या सोशल मीडियावर पाहता येते.
तुम्हीही होऊ शकता पायलट!
कमला मिल कंपाउंडमध्ये आयोजित स्पर्धेत सामील होणाºया प्रेक्षकांनाही ड्रोन चालवण्याची संधी मिळणार आहे. या वेळी अनुभव नसलेल्या ड्रोनचालकांमधील विजेत्यांना प्रशिक्षित पायलट्ससोबत ड्रोन उडवण्याची संधी मिळणार आहे.
बच्चेकंपनीची मजा
बच्चेकंपनीसाठी या ठिकाणी ड्रोन कसा तयार करायचा, याबाबत प्रशिक्षण देणारी कार्यशाळा घेण्यात आली. या मोफत प्रशिक्षणात मुलांनी ड्रोन तयार करून उडवण्याची गंमतही अनुभवली.