हेमंत महाजन यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारताला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत दोन वर्षांचे सदस्यत्व मिळाले आहे. त्याचा उपयोग करून तिबेटचा प्रश्न उचलून धरला पाहिजे. तसेच कोविड-१९ या (कोरोना) चिनी व्हायरसमुळे भारताचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी चीनला जबाबदार धरले पाहिजे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव टाकला गेला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात हेमंत महाजन यांनी चीनशी निगडित अनेक पैलूंचा वेध घेतला. चीनचा एक सैनिक भारतीय सैनिकाने पकडला आहे. आपल्या सीमेत तो चुकून आला नसावा, कारण पेगाँग सरोवराचा दक्षिण किनारा ध्यानात घेतला तर तिथपर्यंत चुकून तो काही इतक्या उंचीवर पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे याबाबतची चीनची वृत्ती संशयास्पद आहे. आपल्या सैनिकांची पाहणी करण्यासाठी चीनने त्याला पाठवले असावे, याबाबत भारत तपासणी करत आहे, अशी माहितीही हेमंत महाजन यांनी दिली.
चीनने चायनीज व्हायरसच्या रूपाने कोरोना जगाला दिला. पण आज भारत संपूर्ण जगाला लस देत आहे. आपल्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी कमी वेळात ही कामगिरी केली आहे. आज जैविक युद्धात भारत सर्वांना आधार ठरत आहे, ही बाब आपल्यासाठी अभिमानाची आहे, असेही हेमंत महाजन म्हणाले.