लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ब्राझीलच्या ‘रिओ दि जानेरो’ येथे नुकत्याच झालेल्या १७व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने एक सुवर्ण आणि चार रौप्यपदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये पुण्याचे आयुष कोठारी आणि सान्निध्या सराफ हे दोन विद्यार्थी चमकले असून, त्यांनी रौप्यपदकांची कमाई केली आहे. त्याचबरोबर बंगळुरू येथील दक्ष तयालिया याने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली असून हैदराबादची बनिब्रता माजी आणि बिहारमधील पाणिनी या दोघांनीही रौप्यपदक पटकाविले आहे.
या स्पर्धेत प्रामुख्याने तीन घटक पाहिले जातात. त्यामध्ये सिद्धान्तासाठी ५० टक्के, निरीक्षण २५ टक्के आणि डेटा विश्लेषणासाठी २५ टक्के गुण असतात. याशिवाय मिश्र-राष्ट्रीय संघांची सांघिक स्पर्धा असते. या वर्षीच्या सैद्धान्तिक घटकाला सूर्यप्रकाश समजणे, आकाशगंगा क्लस्टरच्या वस्तुमानाचा अंदाज लावणे, लघुग्रहांच्या उच्च लंबवर्तुळाकार कक्षांची गणना करणे, पांढऱ्या द्वार्फचे भौतिकशास्त्र, कृष्णविवरांचे अभिवृद्धी डिस्क, इत्यादी विविध विषयांवर मनोरंजक प्रश्न होते. यंदाच्या स्पर्धेत एक घटक हा १९१९ च्या सूर्यग्रहणावर केंद्रित होता. त्यामध्ये सापेक्षतेच्या सामान्य सिद्धान्ताच्या अंदाजांची पुष्टी करण्यासाठी प्रथमच सोब्राल, ब्राझील आणि आफ्रिका येथून डेटा घेण्यात आला होता. दुसऱ्या कार्यात विद्यार्थ्यांना उपग्रहाच्या ग्राउंड ट्रॅक इमेजेसवरून त्याच्या कक्षेच्या गुणधर्माची गणना करण्यास सांगितले.
डेटा विश्लेषणाचे एक कार्य दोन मोठ्या ऑप्टिकल सर्वेक्षणांच्या क्रॉस-कॅलिब्रेशनचे होते. तर निरीक्षण घटकामध्ये गॅलिलिओ-स्कोपच्या साहाय्याने कृत्रिम ताऱ्याचे कोऑर्डिनेट्स मोजणे आणि तारा तक्त्यावर चिन्हांकित करणे हे काम विद्यार्थ्यांना करायचे होते. दरम्यान या संघासोबत इंदूर आयआयटीचे प्रा. भार्गव वैद्य, एचबीसीएसई टीआयएफआरचे प्रितेश रणदिवे, प्रा. अर्णब भट्टाचार्य उपस्थित होते.
भारताचा संघ आठव्या स्थानीयंदाच्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडमध्ये जगभरातील ५२ देशांतील २३२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये भारताचा संघ आठव्या स्थानी राहिला; तर या पदकतालिकेत इराणच्या संघाने ५ सुवर्णपदकांची कमाई करत प्रथम स्थान पटकाविले. यूएसए ३ सुवर्णपदकांची कमाई केली; तर रोमानिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्लोव्हेनिया आणि कॅनडा या देशांनी प्रत्येकी २ सुवर्णपदकांची कमाई केली.