हवामान बदलामुळे ऋतूंचे महिने बदलण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 07:27 AM2020-01-19T07:27:07+5:302020-01-19T07:27:43+5:30
हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत.
- भावेश ब्राह्मणकर
नवी दिल्ली : गेल्या काही वर्र्षातील हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत दिले. मान्सूनच्या आगमन व परतीबाबत हवामान विभाग अभ्यास करत असून त्याबाबत एप्रिलमध्ये घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जून ते सप्टेंबर पावसाळा, आॅक्टोबर ते जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे उन्हाळा असे ऋतुंचे वेळापत्रक भारतात आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत हे सारेच ऋतू मागेपुढे होत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीत थंडी व आॅक्टोबरमध्ये पाऊस पडत आहे. भारतीय हवामानावर प्रामुख्याने परिणाम करणारा घटक म्हणजे मान्सून. मेच्या अखेरीस तो अंदमानात तर १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. मात्र गेल्या काही वर्षांत मान्सून भारतीय महासागरात दाखल झाला तरी मध्य भारतात येण्यास उशीर होत आहे. जूनअखेरीस वा जुलैच्या पहिल्या आठवड्यात तो मध्य भारतात सक्रीय होत आहे. त्याचा परतीचा प्रवासही लांबत आहे. ही बाब हवामान विभागाने गांभिर्याने घेतली आहे. मान्सूनचा दक्षिण, मध्य व उत्तर भारतातील प्रवासाचे नवे महिने निश्चित केले जाणार आहेत. त्याची अधिकृत घोषणा एप्रिलमध्ये होईल, असे डॉ. महापात्र म्हणाले.
डॉ. महापात्र म्हणाले की, मान्सूनच्या आगमन व परतीचे वेळापत्रक बदलल्याचा परिणाम अन्य दोन ऋतूंवरही होतो. हवामान विभाग ऋतूंच्या कालखंडाचाही अभ्यास करतो. तातडीने ऋतूंचे महिने बदलणार नाहीत. मात्र, मान्सूनचा प्रवेश व माघार याचा सध्या अभ्यास सुरू आहे. जगात ३० वर्षांच्या नोंदीद्वारे असे अभ्यास होतात. १९४० ते १९७०, १९७० ते २००० च्या नोंदींचा अभ्यास केला गेला. नंतर २०१० पर्यंतच्या नोंदी तपासल्या. आता आपल्याकडे २०२० पर्यंतची आकडेवारी आहे. १९७० ते २०२० पर्यंत काय व कसे बदल झाले याचा अभ्यास सुरू आहे.
जी काही आकडेवारी हाती येईल, त्याची सरासरी काढली जाईल. जुने ठोकताळे व नव्या नोंदींचा अभ्यास जगभरात केला जातो. तेच आम्ही करत आहोत, असे डॉ. महापात्र म्हणाले.
- डॉ. मृत्युंजय महापात्र