Join us

स्वतंत्र लढण्याचे सेनेचे संकेत

By admin | Published: April 09, 2017 12:43 AM

पनवेल महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. अनेक दिवसांपासून भाजपा-शिवसेना युतीबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती दोन्ही पक्षांच्या वतीने देण्यात येत होती.

- वैभव गायकर, पनवेलपनवेल महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. अनेक दिवसांपासून भाजपा-शिवसेना युतीबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती दोन्ही पक्षांच्या वतीने देण्यात येत होती. मात्र, शनिवारी शिवसेनेच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेलमध्ये स्वबळावर निवडणूक लढवून आपली ताकद दाखविण्याचे संकेत दिल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांकडून देण्यात आली. या वेळी युतीसंदर्भात कोणताच निर्णय झाला नसल्याची माहिती जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांनी दिली. महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असली तरी युतीसंदर्भात निर्णय होत नसल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.शिवसेना-भाजपा युतीवर विरोधी पक्ष अनेक दिवस लक्ष ठेवून आहेत. सेनेचे काही नेते भाजपाशी युती करण्यास अनुकूल आहेत. मात्र, सर्वसाधारण शिवसैनिक स्वबळावर निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. पनवेल तालुक्यात प्राबल्य असलेल्या शेकापने राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी या पक्षांना सोबत घेऊन महाआघाडीची स्थापना केली असून, एकत्र पालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे. शिवसेना भवनावर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हासंपर्कप्रमुख आदेश बांदेकर, जिल्हाध्यक्ष उरणचे आमदार मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रमेश गुडेकर, शिरीष बुटाला, दीपक निकम, तालुकाप्रमुख वासुदेव घरत, खारघर शहरप्रमुख गुरु नाथ पाटील आदी उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे स्वबळावर लढण्याचे आदेश दिल्याची माहिती बैठकीला उपस्थित खारघर शहरप्रमुख गुरु नाथ पाटील यांनी दिली. भाजपा-सेनेमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. सेनेने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत ही संख्या तब्बल ३००च्या जवळपास आहे. भाजपामध्येही प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या कमीतकमी ८च्या घरात आहे. अशा परिस्थितीत युतीचा ताळमेळ बांधायची कसरत उभय पक्षांमध्ये असणार आहे. त्यामुळे अनेकांचा पत्ता कट होणार असल्यानेही स्वबळावर लढण्याचा अजेंडा पुढे आणला आहे.