मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत असून, याबाबत महापालिका आणि अग्निशमन दलाने जेवढे सज्ज राहणे गरजेचे आहे; तेवढेच येथील सोसायटी आणि व्यावसायिक इमारतींनी सज्ज असणे गरजेचे आहे. मात्र याबाबत उदासीनता बाळगण्यात येत असल्याचे अग्निशमन विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे चार हजार इमारतींत अग्निशमन यंत्रणा निकामी असल्याचे निदर्शनास आले आहे.फोर्ट येथे नुकतेच सिंधिया हाउसमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर सुरक्षेकडे लक्ष वेधले असता अग्निसुरक्षेबाबत हलगर्जीपणा बाळगण्यात येत आहे. मुळात मागील वर्षभरापासून आगीच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे.अशा घटना घडल्यास गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असल्यास आग विझविणे सहज सोपे जाते. परंतु अशा यंत्रणा बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजेनादुरुस्त आणि कालबाह्य झालेल्या यंत्रणा दुरुस्त केल्या जात नाहीत; अथवा बदलण्यात येत नाहीत. परिणामी, समस्या उग्र रूप धारण करते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी अग्निशमन यंत्रणेकडून ज्या इमारती तपासण्यात आल्या; त्यामधील सुमारे चार हजार इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा निकामी असल्याचे निदर्शनास आले होते. यावर उपाय म्हणून प्रशासनाने अशा यंत्रणा दुरुस्त कराव्यात किंवा नव्याने बसवाव्यात, अशा सूचनाही केल्या. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी महापालिकेने कारवाईही केली. त्यानंतर काही सोसायट्यांनी यंत्रणा बसविली. मात्र अद्यापही बहुतांशी सोसायट्या, व्यावसायिकांनी यंत्रणा बसविण्याकडे दुर्लक्ष केले आहे.दरम्यान, या प्रकरणी हलगर्जीपणा बाळगत असलेल्या सोसायट्यांना नोटीस पाठवत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावर टाळाटाळ केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. तर दुसरीकडे दरवर्षी अग्निशमन यंत्रणा आॅडिट करून जमा करणे आवश्यक आहे. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. म्हणूनच यंत्रणेची तपासणी करणे सोसायट्यांना, व्यावसायिकांना बंधनकारक आहे.आमची कारवाई अजून सुरूचार हजार इमारतींबाबत अग्निशमन दलाने सांगितले की, ही आकडेवारी अपूर्ण आहे. कारण कारवाई अद्याप सुरू आहे. याबाबतची ठोस कारवाई झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत अग्निशमन यंत्रणा निकामी असलेल्या एकूण इमारतींची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.२५ हजार इमारतींत नियमांकडे दुर्लक्षमुंबई शहरात ज्या इमारतींना मालमत्ता कर लागू होतो; अशा २ लाखांहून अधिक इमारती आहेत. २ लाख इमारतींमध्ये सुमारे २५ हजार इमारती या सात मजल्यांहून अधिक मजल्यांच्या आहेत; या इमारतींमध्ये अग्निशमनाचे नियम पाळले जात नाहीत, असे गृहनिर्माण विषयाचे अभ्यासक रमेश प्रभू यांनी सांगितले.- प्राथमिक अग्निसुरक्षेसाठी आपले ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक आहे. शासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय योजना नियम २००८ लागू करून जनतेला अग्निशमनाबाबत कायद्याचे पाठबळ दिले आहे. या कायद्यामुळे राष्ट्रीय बांधकाम संहिता ही मार्गदर्शिका पुस्तिका सर्वांना बंधनकारक झाली आहे.- बांधकामाधीन इमारती वापरात आल्यानंतर सर्व यंत्रणेची देखभाल आणि निगा तसेच वापराबद्दलची माहिती आपण करून घेणे आवश्यक असते. मात्र देखभाल खर्च, धकाधकीचे जीवन, अपुरे ज्ञान आणि अपुरी इच्छाशक्ती यामुळे ही सर्व यंत्रणा तोकडी पडते.- आपण ज्या जागेत राहत आहोत; त्या जागेचे सुशोभीकरण करताना आपण अग्निसुरक्षेबाबत जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येक उंच इमारतीमध्ये वर्षातून दोनदा तरी निकासन सराव करणे आवश्यक असते.- अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे किंवा अयोग्य विद्युत जोडणीमुळे आगी लागतात असे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेता विद्युत जोडणीची दाब क्षमता, विद्युत उपकरणे, विद्युत खटके (बटन / स्विच), वायरिंग याबद्दल सजग असणे अतिशय गरजेचे आहे.
अग्निसुरक्षेबाबत मुंबईकरांमध्ये उदासीनता; आतापर्यंत चार हजार इमारतींतील अग्निशमन यंत्रणा निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:01 AM