लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दाक्षिणात्य राज्यांप्रमाणे मराठीच्या वापरासाठी कडवी भूमिका राज्यकर्त्यांनी घेणे गरजेचे आहे. मातृभाषेविषयी औदासीन्य हेच भाषिक समस्यांचे मूळ असून, मराठीचा वापर व्यवहारात जास्त करायला हवा, असे मत साहित्यिका निर्मला शेवाळे यांनी व्यक्त केले, तर ज्येष्ठ कवी श्रीकांत करंगूटकर म्हणाले, सरकारने मालवणी भाषेच्या समृद्धीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वांद्रे पूर्व गव्हर्नमेंट क्वाॅर्टर्स रेसिडेन्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद, वांद्रे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त साहित्य मैफलीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, वांद्रे शाखा अध्यक्ष श्रीकांत जाधव, ग्रंथालयप्रमुख विनायक जाधव उपस्थित होते. मैफलीची सुरुवात कवी विशाल सकपाळ, चंद्रकला बाविस्कर यांनी कविता वाचनाने केली. प्रास्ताविक सचिव प्रमोद शेलार आणि आभारप्रदर्शन ग्रंथपाल रोहिणी जोशी यांनी केले.