VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 01:56 PM2024-06-09T13:56:17+5:302024-06-09T14:04:29+5:30
Mumbai : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी दोन मोठ्या विमानांचा अपघात टळला.
Mumbai Airport : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला. शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर दोन विमानांची धडक होता होता वाचली. एकाच धावपट्टीवर दोन विमान एकाच वेळी आल्याने मोठी दुर्घटना घडणार होती. या घटनेत शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. जर हा अपघात झाला असता तर त्यात शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असता. याचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे. मुंबई विमानतळावर एकाच धावपट्टीवर एकाच वेळी एका विमानाने उड्डाण केले तर दुसरे विमान त्याचवेळी उतरले.
शनिवारी सकाळी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर इंडिगो आणि एअर इंडियाची विमाने एकमेकांच्या अगदी जवळ आली होती. यावेळी दोघांमधील धडक थोडक्यात टळली. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत होते, तर एअर इंडियाचे विमान टेक ऑफ करण्यासाठी धावपट्टीवर धावत होते. मात्र एकाच वेळी इंडिगोच्या विमानाने लँडिंग आणि एअर इंडियाच्या विमानाने टेक ऑफ केल्यामुळे मोठा अपघात टळला.
या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आता सोशल मीडियातून समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर वेगाने जात असून इंडिगोचे विमान मागून लँडिंग करत असल्याचे दिसत आहे. मात्र, इंडिगोचे विमान एअर इंडियाच्या विमानाजवळ आले तोपर्यंत त्याचे उड्डाण झाले होते. जर असं झालं नसते तर मोठी दुर्घटना घडली असण्याची शक्यता होती.
Very Close call today at VABB. @IndiGo6E tries to land while an aircraft is still on the roll on RW27. #AvGeekpic.twitter.com/tbHsDXjneF
— Hirav (@hiravaero) June 8, 2024
इंडिगोचे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या २७ क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरत होते. तर एअर इंडियाचे विमान उड्डाण घेत होते. ही दोन्ही एअरबस A320neos विमाने होती. इंडिगोचे विमान ५०५३ देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर रनवे २७ वर लँडिंग करत होते. तर एअर इंडियाचे विमान ६५७ तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते.
दरम्यान, या अपघाताबाबत एअर इंडिया आणि इंडिगोशी संपर्क साधण्यात आला. त्यावर इंडिगोचे उत्तर दिलं. "८ जून २०२४ रोजी इंदूरहून इंडिगो फ्लाइट 6E 6053 ला मुंबई विमानतळावर एटीसीकडून लँडिंग क्लिअरन्स देण्यात आला होता. पायलट इन कमांडने लँडिंग सुरू ठेवले आणि एटीसीच्या सूचनांचे पालन केले. इंडिगो प्रवाशांसाठी सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे," असे इंडिगोकडून सांगण्यात आले.