आजी वारली म्हणून त्याने विमान उडवले नाही; इंडिगोच्या पाटणा-पुणे विमानातील घटना
By मनोज गडनीस | Published: January 18, 2024 04:50 PM2024-01-18T16:50:25+5:302024-01-18T17:37:27+5:30
पाटणा येथून पुण्याला उड्डाण करण्यासाठी रन-वेवर दाखल झालेले विमान अचानक पुन्हा पार्किंगमध्ये दाखल झाले.
मनोज गडनीस, मुंबई : पाटणा येथून पुण्याला उड्डाण करण्यासाठी रन-वेवर दाखल झालेले विमान अचानक पुन्हा पार्किंगमध्ये दाखल झाले. विमानाला विलंब का होत आहे असा प्रश्न प्रवाशांना पडण्याआधीच संबंधित विमानाच्या मुख्य वैमानिकाने आपल्या सह वैमानिकाच्या आजीचे नुकतेच निधन झाल्याची बातमी आली असून त्यामुळे तो विमान उडवणार नसल्याची घोषणा केली. यामुळे विमानाला विलंब होणार याची कल्पना प्रवाशांना आलीच. पण प्रवाशांनी देखील घटनेचे गांभीर्य दाखवत सहानुभुतीचे प्रदर्शन केले.
पुण्याला जाण्यासाठी १६२ प्रवाशांना घेऊन बुधवारी इंडिगो कंपनीचे विमान रन-वेच्या दिशेने हळूहळू यायला लागले. मात्र, तेवढ्यात सह-वैमानिकाला त्याच्या आजीचे निधन झाल्याचा तातडीचा मेसेज आला.
आजीच्या निधनाचे वृत्त ऐकून हळवा झालेल्या वैमानिकाने आपण अशा मनःस्थितीत विमान चालवू शकत नसल्याचे मुख्य वैमानिकाला सांगितले. त्यानंतर मुख्य वैमानिकाने विमान वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत पुन्हा विमान पार्किंगमध्ये आणले. त्यानंतर संबंधित वैमानिक विमानातून उतरून घरी गेला. दरम्यान, प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून विमान कंपनीने अन्य वैमानिकाची व्यवस्था केली. या सर्व घटनेमुळे विमान तीन तास उशीरा उडाल्याची माहिती आहे. मात्र, कंपनीने प्रवाशांच्या खान-पानाची देखील व्यवस्था केली.