Join us  

इंडिगोचे विमान आठ तास लटकले-प्रवाशांचा सोशल मीडियावरून संताप

By मनोज गडनीस | Published: April 28, 2023 11:12 AM

प्रवाशांनी इंडिगोच्या काऊंटरवर वारंवार विचारणा केली, समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा दावा

मनोज गडनीस, मुंबई: मुंबईहून गुरुवारी रात्री दिल्लीला जाणारे इंडिगो एअरलाईन्स कंपनीचे विमान तब्बल ८ तास उशीराने निघाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावरून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. विमानाला जरी विलंब झाला असला तरी प्रवाशांच्या खान-पानाची सोय करत त्यांना त्रास होणार नाही, याची आम्ही दक्षता घेतल्याचा दावा कंपनीने केला आहे.उपलब्ध माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी मुंबईहून दिल्लीला इंडिगोचे ६ई-२५१८ हे विमान रात्री ८ वाजून १० मिनिटांनी उड्डाण करणार होते. मात्र, बराचकाळ विमानासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती.

प्रवाशांनी इंडिगोच्या काऊंटरवर वारंवार विचारणा करून त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा दावा प्रवाशांनी केला. जवळपास दोन ते तीन तासांनंतर विमानाला विलंब होत असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. मात्र, विमान नेमके किती वाजता उड्डाण करणार आहे, याची नेमकी माहिती प्रवाशांना मिळाली नाही. अखेर २८ एप्रिलच्या पहाटे ४ वाजता विमानाने दिल्लीसाठी प्रयाण केले.मूळात खराब हवामानामुळे हे विमान मुंबईतच विलंबाने आले. त्यानंतर पुढील उड्डाणासाठी प्रशासकीय व्यवस्था आणि केबिन क्रूची व्यवस्था करणे, यामुळे आणखी विलंब झाला. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता कंपनीने प्रवाशांच्या खान-पानाची व्यवस्था केली होती, असे सांगतानाच झालेल्या प्रकाराबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

टॅग्स :मुंबईविमानतळ