मुंबई : वैमानिकांच्या कमी संख्येमुळे इंडिगो विमान कंपनीला शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत ७५ पेक्षा अधिक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली, अशी चर्चा इंडिगोच्या कर्मचाऱ्यांत आहे. सोमवारी देशभरातील ३० पेक्षा अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने इंडिगोच्या विमानाने प्रवास करणाºया प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. इंडिगोने मात्र विमाने रद्द होण्यासाठी खराब वातावरणाला जबाबदार ठरवले आहे.विमानांची उड्डाणे रद्द होण्यासाठी खराब हवामान हे एक कारण असले तरी प्रत्यक्षात इंडिगोमध्ये वैमानिकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने विमानांची उड्डाणे रद्द करण्याची वेळ ओढावली असल्याची चर्चा इंडिगोच्या कर्मचाºयांमध्ये आहे. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद व बंगळुरू येथून होणाºया उड्डाणांचा यामध्ये समावेश असल्याने मुंबईसह देशभरातील प्रवाशांना त्याचा फटका बसू लागला आहे. सध्या इंडिगोमध्ये आवश्यकतेपेक्षा सुमारे १०० वैमानिक कमी असल्याने उड्डाणांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. इंडिगोच्या ताफ्यामध्ये २०० पेक्षा अधिक विमाने असून दररोज १३०० पेक्षा अधिक उड्डाणे केली जातात. वैमानिकांना एका महिन्यात कमाल १२५ तासांचे उड्डाण करण्याची परवानगी नागरी विमान उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) तर्फे देण्यात येते.परिस्थिती सुधारण्याचा आशावादइंडिगोने अनेक वैमानिकांना प्रति महिना ७० तासांसाठी करारबद्ध केले आहे. मात्र, वैमानिकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने वैमानिकांना अतिरिक्त काम करावे लागते. सातत्याने विमान उड्डाण करावे लागल्याने वैमानिकांना शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याने वैमानिक अतिरिक्त कामासाठी चांगले वेतन मिळत असतानाही हे काम करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा कर्मचाºयांत आहे. मात्र, कंपनीने विमाने रद्द होणे हा खराब हवामानाचा परिणाम असल्याचे सांगून वेळापत्रकातील बदल, कर्मचारी व वैमानिकांच्या ड्युटीमध्ये बदल करून परिस्थिती लवकरच सुधारेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
तीन दिवसांत इंडिगोची ७५हून अधिक उड्डाणे रद्द; वैमानिकांच्या कमतरतेचा फटका बसल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 1:22 AM