मुंबई : भारतीय नागरिकांसाठी थायलंडने व्हिसा मुक्त प्रवेशांची घोषणा केल्यानंतर तिथे प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता इंडिगो विमान कंपनीने मुंबई ते फुकेट मार्गावर अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
मुंबई ते फुकेट या सेवेची सुरुवात येत्या ५ जानेवारी २०२४ पासून होणार आहे. यानुसार, इंडिगो कंपनीची आता प्रत्येक आठवड्याला १३ विमाने फुकेटसाठी उड्डाण करणार आहेत. याचसोबत बंगळुरू येथून देखील फुकेटसाठी आठवड्याला ६ विमानांची सेवा कंपनी सुरू करणार आहे.
चार देशांचा समावेश
या अतिरिक्त फेऱ्यांमुळे इंडिगो देशाच्या विविध विमानतळांवरून आठवड्याला एकूण ५६ विमानांद्वारे प्रवाशांना थायलंड येथे घेऊन जाणार आहे. चालू वर्षात आतापर्यंत थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका या चार देशांनी भारतीय नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या चारही देशांत जाणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे.