इंडिगोची ३१ मार्चपर्यंत दररोज ३० विमाने होणार रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 01:35 AM2019-02-14T01:35:14+5:302019-02-14T01:35:30+5:30
वैमानिकांच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या विमानांची उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बुधवारीदेखील इंडिगोची देशभरातील तब्बल ४९ उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.
मुंबई : वैमानिकांच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या विमानांची उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बुधवारीदेखील इंडिगोची देशभरातील तब्बल ४९ उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. ३१ मार्चपर्यंत दररोज ३० विमाने रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे प्रमाण इंडिगोच्या एकूण उड्डाणाच्या २ टक्के आहे.
रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांबाबत प्रवाशांना आगाऊ माहिती देण्यात आल्याचे इंडिगोने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला कळविले आहे. केबिन क्रू व वैमानिकांना अतिरिक्त काम करावे लागत असल्याने कामाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे गोंधळ झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. मार्च महिन्यातील उर्वरित दिवसांमध्ये दररोज ३० विमाने रद्द करण्यात येणार असल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कामाचे वेळापत्रक बदलण्यात येईल व त्याबाबत प्रवाशांना आगाऊ माहिती देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना दुसरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी याबाबत प्रवाशांना वेळेवर माहिती देण्यात येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.