मुंबई - गेल्यावर्षी विमानाची कमी झालेल्या संख्या आणि वाढलेली विक्रमी प्रवाशांची संख्या यामुळे विमान प्रवासाच्या तिकीटांचे दर गगनला भिडले होते. मात्र, आता या मध्ये काही प्रमाणात दिलासा मिळणार असून इंडिगो कंपनीने तिकिटांवर आकारण्यात येणारे इंधन अधिभार शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे. परिणामी इंडिगो कंपनीच्या विमान तिकिटांचे दर एक हजार रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.
विमान इंधनाच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ५ ऑक्टोबरपासून इंडिगोने तिकीटांवर इंधन अधिभार आकारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे तिकीटांचे दर वाढले होते. मात्र, आता विमान इंधनाच्या दरात कपात झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने हा अधिभार रद्द करण्याची घोषणा केली आहे. गुरुवार पासून तातडीने ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे.