मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि तत्कालीन अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या कथित भेटीसंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपले विधान मागे घेतले असले तरी इंदिरा गांधी या हाजी मस्तान आणि करीम लाला यांना भेटत असत. या भेटी मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत, असा दावा हाजी मस्तानचा मानलेला मुलगा सुंदर शेखर याने केला आहे.
इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या कथित भेटीवरून वादंग निर्माण झाले आहे. यासंदर्भात सुंदर शेखर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, इंदिरा गांधी मुंबईत येणार असतील तर करीम लाला यांना दोन दिवस आधीच समजत असे. मी त्यांच्यासोबत गेलोही होतो. तेव्हा मी इंदिराजींना पाहिले आहे. अनेक नेते करीम लाला यांना भेटायचे. हाजी मस्तान हे व्यावसायिक होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची चांगली मैत्री होती, असा दावाही सुंदर शेखर यांनी केला आहे. सध्या इंदिरा गांधी आणि करीम लाला यांचा फोटो दाखविला जात आहे तो राष्ट्रपती भवनातील आहे. राष्ट्रपती भवनात ही भेट झाली ही बाबही खरी आहे, असे शेखर यांचे म्हणणे आहे.काय म्हणाले राऊत?पुण्यात लोकमत पत्रकारिता सोहळ्यात झालेल्या मुलाखतीत मुंबई अंडरवर्ल्डचे वृत्तांकन करतानाचे अनुभव सांगताना राऊत म्हणाले , ‘‘आता काहीच अंडरवर्ल्ड उरलेले नाही. ज्यांनी त्या वेळचा काळ पाहिला, त्यांना शिकागोचे अंडरवर्ल्ड कमी वाटले असते. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, शरद शेट्टी यांच्या हातामध्ये मुंबई होती. ते ठरवायचे की, मुंबईत काय होणार, कमिशनर कोण होणार. मंत्रालयात कोण बसणार. हाजी मस्तानला घ्यायला अख्खे मंत्रालय खाली यायचे, हे मी पाहिले आहे. करीम लालाला भेटायला स्वत: इंदिरा गांधी जायच्या.’