'व्यक्तिगत स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकारापेक्षा मौल्यवान'; आरोपीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:28 PM2023-10-12T12:28:58+5:302023-10-12T12:29:13+5:30
कुर्ला येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय आरोपीकडे २० ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थ कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
मुंबई : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची सुटका केली आहे. आरोपीला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होत असून आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे; तसेच एखाद्याचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकारापेक्षा मौल्यवान असल्याचे स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीची ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.
कुर्ला येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय आरोपीकडे २० ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थ कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
- या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी आरोपीच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्या अर्जावर अतिरिक्त न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना कोर्टाला सांगण्यात आले की, पोलिसांना सापडलेले मेफेड्रोन अल्प प्रमाणात होते. आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही; तसेच आरोपी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत असून गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे; त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीची काही अटी व शर्तींवर सुटका केली.