शास्त्रीय पुरावा नाही; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) संपूर्ण देशात सेरो सर्वेक्षण केले. देशातील किती व्यक्तींच्या शरीरात प्रतिपिंड आहेत, याची चाचपणी करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनापासून बचाव करण्याची क्षमता किती लोकसंख्येत आहे, याची पडताळणी, हा सर्वेक्षणामागचा प्रमुख उद्देश होता. सर्वेक्षणानुसार, ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचे दिसून आले. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, या अभ्यासाला शास्त्रीय पुरावा नसून, हे केवळ निरीक्षण आहे.
सीएसआयआरच्या देशभरातील ४० हून अधिक केंद्रांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १० हजार ४२७ व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील घेण्यात आला. या व्यक्ती स्वेच्छेने सर्वेक्षणात सहभाग झाल्या हाेत्या. सीएसआयआरचे १४० शास्त्रज्ञ आणि चिकित्सक सर्वेक्षण प्रक्रियेचा भाग होते. सर्वेक्षणानुसार, ओ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असतो, तर बी आणि एबी रक्तगटाच्या व्यक्तींना काेराेनाचा जास्त धोका असतो.
याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, केवळ १० हजार ७१४ नागरिकांचे सर्वेक्षण करून हे निरीक्षण नाेंदविण्यात आले आहे. याला शास्त्रीयदृष्ट्या काहीही आधार नाही. सध्या राज्यासह मुंबईत काेराेनाची रुग्णसंख्या स्थिरावत आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सामान्य नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहेत. मास्कचा वापर, स्वच्छता, शारीरिक अंतर पाळणे गरजेचे आहे.
निरीक्षणांवर अवलंबून राहणे चुकीचे
देशासह राज्यातील संस्थांमध्ये अशा स्वरूपाचे सर्वेक्षण, अहवाल समोर येत असतात. मात्र, हे अभ्यास, अहवाल केवळ निरीक्षणांचा भाग आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी यावर अवलंबून न राहता काळजी घेणे आणि सुरक्षित राहणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. रंजित केणी यांनी दिला.
........................................