भारत-इस्रायल मैत्री लाभदायी

By admin | Published: September 28, 2016 01:17 AM2016-09-28T01:17:50+5:302016-09-28T01:17:50+5:30

भारत आणि इस्रायलमध्ये अनेक बाबतींत समानता आहे. दोन्ही देशांपुढील बहुतांश आव्हानेही सारखीच आहेत. त्यामुळे हे देश एकमेकांचे स्वाभाविक मित्र असून गेल्या पंचवीस

Indo-Israel Friendships Beneficial | भारत-इस्रायल मैत्री लाभदायी

भारत-इस्रायल मैत्री लाभदायी

Next

मुंबई : भारत आणि इस्रायलमध्ये अनेक बाबतींत समानता आहे. दोन्ही देशांपुढील बहुतांश आव्हानेही सारखीच आहेत. त्यामुळे हे देश एकमेकांचे स्वाभाविक मित्र असून गेल्या पंचवीस वर्षांपासूनच्या मैत्रिपूर्ण संबंधांचा लाभ कृषी, उद्योग, जलव्यवस्थापन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांत उभय राष्ट्रांना झाला आहे, असे प्रतिपादन इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कॅरमन यांनी केले.
कॅरमन यांच्यासह इस्रालयचे कॉन्सेल जनरल डेव्हिड अकोव्ह आणि राजकीय सचिव अ‍ॅडव्हा विल्चिन्स्कि यांनी मंगळवारी ‘लोकमत’च्या मुंबईतील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी परस्पर सहकार्याने भारतात सुरू असलेल्या इस्रायलच्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. तसेच संपादकीय विभागाशी चर्चा करून राज्य आणि देशातील सामाजिक तथा राजकीय घडामोडींमागील संदर्भ जाणून घेण्याचे प्रयत्न केले.
बागायती शेती उत्पादनांसाठी इस्रायलने राज्यात दापोली (रत्नागिरी), औरंगाबाद, नागपूर आणि राहुरी (अहमदनगर) येथे चार केंद्र स्थापन केली आहेत. शेतीसंदर्भातील संशोधन, उत्पादकांना मार्गदर्शन, काही प्रमाणात उत्पादनांची खरेदी अशी कामे या केंद्रावर केली जातात. देशभरात अशा प्रकारची १५ केंद्र सध्या सुरू असून येत्या काळात त्यात आणखी २५ केंद्राची भर घालण्यात येणार असल्याचेही माहिती या वेळी कॅरमन यांनी दिली. तसेच भारत-इस्रायल सहकार्याने देशभर सुरू असणाऱ्या कृषीविषयक उपक्रमांचे जगभरात कौतुक होत आहे.
पठाणकोट, उरी आदी दहशतवादी हल्ल्यांनंतरही आंतरराष्ट्रीय स्तरावर संयमी प्रतिक्रिया दिल्याबद्दल डेव्हिड अकोव्ह यांनी भारतीयांचे कौतुक केले. तसेच दहशतवादाचा निपटारा करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात भारताला सर्वतोपरीने सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. केंद्रीय संरक्षण दले आणि राज्या-राज्यांतील संरक्षण दलांना संरक्षण क्षेत्रात इस्रायलकडून अनेक वर्षांपासून साहाय्य करण्यात येत आहे आणि यापुढेही त्यात वाढच होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. इस्रायलमध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे, तरीही उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा ९० टक्क्यांपर्यंत उपयोग करून इस्रायलने पाणीटंचाईवर मात केली आहे. आम्ही देशवासियांकडून पाण्यासाठी पैसे घेतो. त्यामुळे त्यांना पाण्याची किंमत कळते आणि त्याचा वापर काटकसरीने केला जातो. तसेच यातून मिळालेले पैसे पाण्यासाठीच वापरता येतात. भारतात मात्र पाण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत, हे आश्चर्यच आहे. जनजागृती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील पाणीटंचाईचेही निराकरण करता येईल, असे कॅरमन म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Indo-Israel Friendships Beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.