Join us

भारत-अमेरिका संबंध सध्या सर्वोच्च शिखरावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 4:40 AM

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत यांच्यातील धोरणात्मक संबंधांना यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत

मुंबई : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत यांच्यातील धोरणात्मक संबंधांना यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे सध्या अमेरिका आणि भारतातील संबंध यापूर्वी कधीही नव्हते अशा सर्वोच्च शिखरावर आहेत. यापुढेही दोन्ही देशांतील व्यक्ती- व्यक्तींतील संबंध, तसेच लोकशाही, स्वातंत्र्य आणि समान मूल्यांवर आधारित नातेबंध कायम राहतील व वृद्धिंगत होतील, असा विश्वास अमेरिकेचे मुंबईतील कौन्सुल जनरल एडगार्ड कॅगेन यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. दक्षिण मुंबईत आयोजित अमेरिकी राष्टÑीय दिन सोहळ्यात कॅगेन बोलत होते.तांत्रिक कारणांमुळे मुंबईतील अमेरिकी दुतावासाने अमेरिकेचा २४१ वा राष्टÑीय दिन ४ जुलैऐवजी ११ आॅगस्टच्या रात्री साजरा केला. या वेळी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उभय देशांच्या राष्टÑगीतांनी सुरुवात झालेल्या या सोहळ्यात अमेरिकेच्या मरीन कॉर्प्सनी दिमाखदार संचलन केले. तसेच ‘जॅझ’ संगीताने कार्यक्रमात रंगत आणली.‘भारत शोधायला निघालेला दर्यावर्दी कोलंबस अमेरिकेलाच भारत समजून बसला होता. त्या वेळी त्याला जे वाटले, ते आज सर्वार्थाने खरे ठरले आहे. कारण आज अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रात भारतीयांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे अमेरिकेत एक भारत पाहायला मिळतो,’ असे मत व्यक्त करत मुख्य सचिव सुमित मलिक यांनी भारत-अमेरिका संबंधांचे कौतुक केले. तसेच अमेरिकी स्वातंत्र्याचा आढावा घेत अमेरिकी नागरिकांना राष्टÑीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.