सचिन लुंगसे मुंबई : बंदिस्त जागेत (इनडोअर) नोंदविण्यात येणारे प्रदूषण अधिक धोकादायक असून, त्यामुळे देशात दरवर्षी १३ लाख लोकांचा बळी जातो. स्वयंपाक बनविण्यासह इतर प्रदूषण व अन्य काही घटकांंमुळे घरातील हवेचा दर्जा घसरत चालला आहे. महत्त्वाचे म्हणजे, बाहेरील प्रदूषणाच्या तुलनेत बंदिस्त जागेतील प्रदूषण दहापट जास्त धोकादायक ठरत आहे.
यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना ‘वायुप्रदूषण’ आहे. वायुप्रदूषणाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, रशियासह भारतातही धोका निर्माण केला आहे. सर्वसाधारणपणे ९० टक्के वेळ माणूस घर किंवा कार्यालयाच्या ठिकाणी असतो. कधी-कधी घरातल्या प्रदूषणाचा स्तर बाहेरील प्रदूषणाच्या स्तराच्या तुलनेत १० ते ३० पटीने अधिक असतो. विविध रसायने, साफसफाईसाठी वापरण्यात येणारी उत्पादने, धूळ, सुगंधी द्रव्ये, तंबाखूचा धूर, तापमान, आर्द्रता, तसेच पडदे, गाद्या, उशी यावर साचणारी धूळ, पाळीव प्राणी असे अनेक घटक बंदिस्त जागेतील (इनडोअर) प्रदूषणास कारणीभूत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हे प्रदूषण मोजण्यासाठीचे कोणतेच मापक नाही. सरकारी यंत्रणा तर याबाबत अगदीच सुस्त आहे. त्यामुळे इनडोअर प्रदूषण दुर्लक्षितच राहिले आहे.
होणारे आजार
- इनडोअर प्रदूषणामुळे डोळे, नाक आणि घसा चुरचुरतो. डोकेदुखी आणि चक्कर येण्यासह दम लागणे याचाही यात समावेश आहे.
- हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांचाही धोका निर्माण होऊ शकतो.
- अस्थमाच्या रुग्णांना इनडोअर प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो.
उपाययोजना
- दारे-खिडक्या उघड्या ठेवणे. हवा खेळती ठेवणे. मात्र प्रदूषित शहरांत हे आणखी धोकादायक आहे. कारण अशावेळी बाहेरच्या वातावरणातील प्रदूषित घटक घरातील वातावरणात मिसळू शकतात.
- घरात छोट्या रोपट्यांची लागवड करणे. धूम्रपान टाळावे.
- फ्रिज आणि ओव्हनसारख्या उपकरणांची योग्यवेळी दुरुस्ती करून घ्यावी.
- घरातील कोपरे आणि फर्निचरखालील जागा स्वच्छ ठेवावी.
- कीटकनाशकांचा वापर शक्य तेवढा कमी करावा.
- चादरी, बेडशीट आदी ६० अंश सेल्सिअस तापमानात धुवावी.