इंद्राणी मुखर्जी अखेर कारागृहाबाहेर; साडेसहा वर्षांनी सुटका, म्हणाली, ‘मैं बहुत खुश हूँ...’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:03 AM2022-05-21T06:03:52+5:302022-05-21T06:05:19+5:30

इंद्राणी मुखर्जीचा मेकओव्हर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

indrani mukherjee finally out of jail after six and a half years | इंद्राणी मुखर्जी अखेर कारागृहाबाहेर; साडेसहा वर्षांनी सुटका, म्हणाली, ‘मैं बहुत खुश हूँ...’

इंद्राणी मुखर्जी अखेर कारागृहाबाहेर; साडेसहा वर्षांनी सुटका, म्हणाली, ‘मैं बहुत खुश हूँ...’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शीना बोरा हत्याकांडानंतर, पाच महिन्यांपूर्वी ती जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी मुखर्जी अखेर साडेसहा वर्षाने शक्रवारी कारागृहाबाहेर  पडली. यावेळी, इंद्राणीचा मेकओव्हर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर, माध्यमांशी बोलताना ‘मैं बहुत खुश हूँ’, असे तिने सांगितले. 

मुंबई उच्च न्यायालय, सत्र न्यायालयांनी यापूर्वी ७ वेळा  इंद्राणीचे  वेगवेगळे जामीन अर्ज फेटाळून लावले होते.  मुंबई पोलिसांनी पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बंदुकीसह अटक केल्यानंतर, हे प्रकरण समोर आले होते. २५ ऑगस्ट २०१५ रोजी मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर तिची भायखळा कारागृहात रवानगी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर,  दोन दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास इंद्राणी कारागृहाबाहेर पडली. बाहेर, माध्यमांना प्रतिक्रिया देत ती वकिलांसह मर्सिडिजमधून वरळीच्या घराकडे निघाली.

इंद्राणीने स्वत: केला मेकओव्हर... 

कारागृहात असताना, इंद्राणीचे केस पांढरे आणि थकलेला चेहरा अनेकदा समोर आला होता. मात्र, शुक्रवारी इंद्राणीचे काळे भोर केस  आणि मेकअप पाहून माध्यमांसह तेथे उपस्थित लोकही थक्क झालेले पाहावयास  मिळाले. हसत हसतच इंद्राणी वकिलासह मर्सिडिजमधून घराकडे निघाली. कारागृह अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला कारागृहात महिला कैद्यांना अनेकदा पार्लरचेही प्रशिक्षण दिले जाते तसेच, त्यांना कधी कोणी भेटायला येणार असल्यास त्यासाठी केस काळे करण्यासह मेकअपचे अन्य साहित्यदेखील पुरविले जाते. त्यानुसार, इंद्राणीनेही जामीन मंजूर होताच स्वतःचा मेकओव्हर केल्याची माहिती समजते आहे.

काय आहे प्रकरण?

- २०१२ मध्ये इंद्राणीने एका कारमध्ये शीनाची गळा दाबून हत्या केल्याची माहिती ड्रायव्हरने दिली होती. इंद्राणीच्या अटकेनंतर तिचा आधीचा पती संजीव खन्ना यालाही मुलीच्या हत्येत मदत केल्याप्रकरणी आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती. 

- इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी याला शीना आपली बहीण असल्याचे इंद्राणीने सांगितले होते. शीना बोरा आणि पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल यांच्यात जवळीक होती. 

- २०१२ मध्ये शीना अचानक बेपत्ता झाल्यानंतर राहुलने तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. जेव्हा हे प्रकरण समोर आले, तेव्हा इंद्राणीनेच शीनाची कारमध्ये गळा दाबून हत्या करत, रायगड जिल्ह्यात तिचा मृतदेह जमिनीत पुरला, असे समोर आले. 

- शीना बोराचे अवशेषही केंद्रीय यंत्रणांना सापडले होते, मात्र इंद्राणीने ते मान्य केले नव्हते. या प्रकरणात इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी यांनाही सीबीआयने अटक केली होती. 

- २०२० मध्ये त्यांना जामीन मिळाला होता. या सुनावणीच्या काळाच २०१९ मध्ये १७ वर्षे सोबत असलेल्या पीटर यांनी घटस्फोट घेतला. सीबीआयकडून याप्रकरणाचा तपास बंद होत असताना, इंद्राणीने पाच महिन्यांपूर्वी शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करत सीबीआयला पत्र लिहिल्यामुळे याप्रकरणाला वेगळे वळण लागले. 

- कारागृहात आलेल्या एका महिलेला शीना काश्मीरमध्ये दिसल्याचे तिने यंत्रणेला सांगितले. याबाबत, सीबीआय अधिक तपास करत आहे.

काही दिवसांपूर्वीच फ्लॅटची डागडुजी

इंद्राणीसाठी वरळीतील फ्लॅटची काही दिवसांपूर्वी डागडुजी करण्यात आली होती. वरळी येथील मार्लोव्ह को. ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पीटर मुखर्जी यांचे १८ आणि १९ मजल्यावर दोन डुप्लेक्स फ्लॅट आहेत. यापैकी एक फ्लॅट हा इंद्राणीला गिफ्ट देण्यात आला होता.

Web Title: indrani mukherjee finally out of jail after six and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.