लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गाजलेल्या हत्याकांडापैकी एक असलेल्या शीना बोरा हत्याकांडात आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा जिवंत असल्याच्या केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. आता शीनाला काश्मीरमध्ये पाहणारी ही महिला अधिकारी याबाबत सीबीआयला जबाब देण्यास तयार असल्याचेही मुखर्जी यांची वकील सना खान यांनी सांगितले आहे. तसेच सीबीआयकडे याबाबत सखोल तपास करण्याची विनंती केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
शीना बोरा हत्या प्रकरणात २०१५ पासून इंद्राणी भायखळा कारागृहात आहे. गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता. जामिनासाठी ती सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. एकीकडे इंद्राणी वेळोवेळी आपला जबाब बदलत असताना, गेल्या आठवड्यात १६ डिसेंबर रोजी इंद्राणीने केलेल्या दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांनी सीबीआयला पत्र लिहून दिलेल्या माहितीत ‘काही दिवसांपूर्वीच तुरुंगात भेटलेल्या एका महिला अधिकारीकडून शीना बोरा जिवंत असून, ती काश्मीरमध्ये असल्याची माहिती मिळाली. तसेच त्या महिलेने शीनासोबत भेट झाल्याचेही नमूद केले होते. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.