Join us

इंद्राणी मुखर्जीनं पीटरकडे घटस्फोटासहीत केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 1:12 PM

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जीला कारागृहातून घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.

मुंबई - बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जीला कारागृहातून घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. पीटरदेखील शीना बोरा हत्याकांड प्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत आहे. सहमतीनं घटस्फोट घेण्यासंदर्भातील नोटीस इंद्राणीनं स्पीड पोस्टनं पीटरला पाठवली आहे. दोघांनीही प्रेम विवाह केल्याचं नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ठरल्यानुसार, आर्थिक तडजोड स्वीकारुन पीटरनं सहमतीनं घटस्फोट देण्याची मागणी इंद्राणीनं केली असून त्याच्या संपत्तीतील अर्धा हिस्सादेखील तिनं मागितला आहे. यामध्ये दोघांच्या स्पेन आणि लंडनमधील मालमत्तेचा सहभाग आहे. याशिवाय, बँकांमधील काही फिक्स्ड डिपॉझिट आणि अन्य खात्यांचाही इंद्राणीनं पाठवलेल्या नोटिशीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.  

नोटीसमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, पीटर आणि इंद्राणीनं 8 नोव्हेंबर 2002 साली विशेष विवाह कायद्यांतर्गत आणि 10 नोव्हेंबर रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.  दोन वर्षे तुरुंगात काढल्यानंतर इंद्राणीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. इंद्राणीने पीटरला दोन पानांची नोटीस पाठवली आहे. इंद्राणीनं नोटिशीद्वारे पीटरला 30 एप्रिलपर्यंत सहमतीनं आर्थिक तडजोड करण्यास सांगितले आहे. दरम्यान, शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणीला 2015मध्ये अटक करण्यात आली. स्वत:च्याच मुलीची संपत्तीसाठी हत्या केल्याचा आरोप सीबीआयने इंद्राणीवर ठेवला आहे.

इंद्राणीची सुनावणी आता ‘व्हीसी’द्वारे?आपल्या जिवाला धोका असल्याची भीती शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी ही न्यायालयात व्यक्त करीत असल्याने, तिची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)ने घेण्याबाबतचा विचार तुरुंग विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याबाबत आवश्यकतेनुसार लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जी