शीना जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी येणार बाहेर; ७ जामीन अर्ज फेटाळले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:58 AM2022-05-19T05:58:30+5:302022-05-19T05:59:03+5:30

शीना बोरा हत्याकांडानंतर, पाच महिन्यांपूर्वी ‘ती’ जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी मुखर्जी अखेर साडेसहा वर्षांनी कारागृहाबाहेर येणार आहे.

indrani mukherjee will come out from jail 7 bail applications were rejected | शीना जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी येणार बाहेर; ७ जामीन अर्ज फेटाळले होते

शीना जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी येणार बाहेर; ७ जामीन अर्ज फेटाळले होते

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शीना बोरा हत्याकांडानंतर, पाच महिन्यांपूर्वी ‘ती’ जिवंत असल्याचा दावा करणारी इंद्राणी मुखर्जी अखेर साडेसहा वर्षांनी कारागृहाबाहेर येणार आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालय, सत्र न्यायालयांनी वेगवेगळे ७ जामीन अर्ज फेटाळले होते. यादरम्यान, इंद्राणीने कारागृहातही स्वतःचा दबदबा तयार करण्याचा प्रयत्न केला होता. 

मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बंदुकीसह अटक केल्यानंतर, हे प्रकरण समोर आले होते. २५ ऑगस्ट २०१५ रोजी मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर तिची भायखळा कारागृहात रवानगी करण्यात आली. २०१२ मध्ये इंद्राणीने एका कारमध्ये शीनाची गळा दाबून हत्या केल्याची माहिती ड्रायव्हरने दिली होती. इंद्राणीच्या अटकेनंतर तिचा आधीचा पती संजीव खन्ना यालाही मुलीच्या हत्येत मदत केल्याप्रकरणी आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी याला शीना आपली बहीण असल्याचे इंद्राणीने सांगितले होते. शीना बोरा आणि पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल यांच्यात जवळीक होती. २०१२ साली शीना अचानक बेपत्ता झाल्यानंतर राहुलने तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. जेव्हा हे प्रकरण समोर आले, तेव्हा इंद्राणीनेच शीनाची कारमध्ये गळा दाबून हत्या करत, रायगड जिल्ह्यात तिचा मृतदेह जमिनीत पुरला. शीना बोराचे अवशेषही केंद्रीय यंत्रणांना सापडले होते, मात्र इंद्राणीने ते मान्य केले नव्हते. या प्रकरणात इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी यालाही सीबीआयने अटक केली होती. २०२० साली त्याला जामीन मिळाला होता. या सुनावणीच्या काळातच २०१९ साली १७ वर्षे सोबत असलेल्या पीटर यांनी घटस्फोट घेतला.

सीबीआयकडून याप्रकरणाचा तपास बंद होत असताना, इंद्राणीने पाच महिन्यांपूर्वी शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करत सीबीआयला पत्र लिहिल्यामुळे याप्रकरणाला वेगळे वळण आले. कारागृहात आलेल्या एका महिलेला शीना काश्मीरमध्ये दिसल्याचे तिने यंत्रणेला सांगितले. याबाबत, सीबीआय अधिक तपास करत आहे.

मंजुळा शेट्ये प्रकरणीही इंद्राणी आक्रमक 

भायखळा कारागृहातील वर्चस्वाच्या वादातूनच कैदी मंजुळा शेट्ये हिला अमानुषपणे मारहाण करत तिची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर कारागृहातील कैद्यांनी आंदोलन छेडले होते. यादरम्यानदेखील इंद्राणीने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच, कारागृहातही सुरुवातीच्या काळात तिने स्वतःचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title: indrani mukherjee will come out from jail 7 bail applications were rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.