Join us

इंद्राणी मुखर्जीच्या जामिनावरील निकाल १० डिसेंबर रोजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 2:45 AM

इंद्राणी आजारी असून तिची तब्येत खालावत आहे. तिला गेल्या वेळेस केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या जामीन अर्जावर १० डिसेंबर रोजी विशेष न्यायालय निकाल देणार आहे. इंद्राणी हिने तब्येत ठीक नसल्याचे कारण देत, जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली.इंद्राणी आजारी असून तिची तब्येत खालावत आहे. तिला गेल्या वेळेस केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. मात्र, आता स्थिती वेगळी आहे, असे इंद्राणीच्या वकिलांनी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. जे. सी. जगदाळे यांना सांगितले. आतापर्यंत ३६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या दरम्यान तिची तब्येत खालावत राहिली, असेही इंद्राणीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितली.इंद्राणीची जामिनावर सुटका केली, तर ती साक्षीदारांवर दबाव टाकेल, अशी भीती सरकारी वकिलांनी न्यायालयात व्यक्त केली. त्यांचा हा युक्तिवाद फेटाळताना इंद्राणीच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली की, न्यायालयाने इंद्राणीला ठरावीक काळापुरताच जामीन मंजूर करावा. या दिवसांत ती चेकअप करून घेईल.सप्टेंबर, २०१८ मध्ये इंद्राणीने केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. मात्र, तेव्हापासून तिची प्रकृती अधिक गंभीर झाल्याचे किंवा आणखी खालाविल्याचे पुरावे नाहीत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने इंद्राणीच्या जामीन अर्जावर १० डिसेंबर रोजी निकाल देऊ, असे स्पष्ट केले.प्रॉपर्टीच्या वादातून स्वत:चीच मुलगी शीना बोरा हिची एप्रिल, २०१२ मध्ये इंद्राणीने हत्या केली, असा आरोप सीबीआयने केला आहे. हे सर्व प्रकरण एप्रिल, २०१५ मध्ये उघडकीस आले. इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक झाली. चौकशीअंती शीना बोरा हत्या प्रकरण पोलिसांसमोर आले. या प्रकरणी सीबीआयने इंद्राणी, तिचा आधीचा पती संजीव खन्ना व पीटर मुखर्जी यांना अटक केली, तर राय माफीचा साक्षीदार ठरला.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जी